आशा, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविकांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:12 AM2021-09-25T04:12:54+5:302021-09-25T04:12:54+5:30
अमरावती : आशा वर्कर, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदींच्या प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवार, २४ सप्टेंबर रोजी एक दिवसीय संप पुकारला ...
अमरावती : आशा वर्कर, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदींच्या प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवार, २४ सप्टेंबर रोजी एक दिवसीय संप पुकारला होता. प्रलंबित मागणीकडे राज्य व केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संटघना (आयटक)ने जिल्हा परिषदेसमोर तर सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) जिल्हा शाखेतर्फे जिल्हा कचेरीसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जि.प. सीईओ व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविले आहे.
आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, आरोग्य विभागात कायम करावे, आशांना किमार १८ हजार रुपये वेतन द्या, जननी सुरक्षा योजनेतील लाभासाठी द्रारिद्र्यरेषेची अट शिथिल करून सर्वांना लाभ द्या, गटप्रवर्तकांना २१ हजार किमान वेतन द्यावे यासह १८ मागण्यांसाठी हा संप पुकारला होता. यावेळी आंदोलनात आशा कर्मचारी गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हा सचिव प्रफुल्ल देशमुख, नीळकंठ ढोके, सविता अकोलकर, सुषमा रहागडाले, आशा गायगोले, ललिता ठाकरे, वनिता कडू, ज्योती अग्रवाल, वनिता लव्हाळे, संगीता भस्मे, आशा ठाकारे, सीटूचे आंदोलनात अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश सोनुले, जिल्हा सचिव पद्या गजभिये, आशा वर्कर संघटनेचे अध्यक्ष सुभाष पांडे, सचिव वंदना बुराडे आदींसह अन्य पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.