महाराष्ट्रातील वाघांचे ‘डिमोशन’; राज्य शासनाचे दुर्लक्ष

By गणेश वासनिक | Published: September 7, 2024 08:55 PM2024-09-07T20:55:10+5:302024-09-07T20:55:18+5:30

भारतीय वनसेवेतील लॉबीचा प्रताप : वन्यजीव विभागाचे पंख छाटले

'Demotion' of tigers in Maharashtra; Neglect of the State Govt | महाराष्ट्रातील वाघांचे ‘डिमोशन’; राज्य शासनाचे दुर्लक्ष

महाराष्ट्रातील वाघांचे ‘डिमोशन’; राज्य शासनाचे दुर्लक्ष

अमरावती : राज्य शासनाच्या नाकावर टिचून महाराष्ट्रातील भारतीय वनसेवा (आयएफएस) लॉबीने वन्यजीव विभागाचे पंख छाटल्याचे दिसून येते. अत्यंत संवेदनशील असणाऱ्या या वन्यजीव विभागाचे नव्हे तर एक प्रकारे वाघांचे ‘डिमोशन’ केल्याच्या भावना आता व्यक्त होत आहेत.

महाराष्ट्रात वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विदर्भात तर दरदिवशी वाघ आणि मानव संघर्षाच्या घटना घडतच आहेत. त्यामुळे वन्यजीव विभागाला सशक्त करण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे प्रयत्नरत असले तरी त्यांच्या विभागातील ‘सरदार’ मात्र आत्मीयता ठेवत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात वन्यजीव विभागात ‘पनीशमेंट पोस्टिंग’ समजली जाते. आजही ‘टॉप टू बॉटम’ अनेक पदे रिक्त आहे. परंतु आयएफएस लॉबी सोयीनुसार पदांची व्यवस्था करीत आहे.

आता वन्यजीवमध्ये पीसीसीएफ नसणार
महसूल व वनविभागाने ५ सप्टेंबर २०२४ रोजी ३० आयएफएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जारी केली आहे. यात वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक या सर्वोच्च पदाचे डिमाेशन केले आहे. हा प्रकार म्हणजे वाघांचे डिमोशन मानले जात आहे. वन्यजीव विभागात आता पीसीसीएफ हे पद यापुढे नसणार आहे. विवेक खांडेकर यांना अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक म्हणून नियम १९६६च्या ४(२)चा आधार घेत पोस्टिंग दिली आहे. त्यामुळे वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक हे पद अस्थगित ठेवण्याची किमया आयएफएस लॉबीने केली आहे.

वनमंत्र्यांना ठेवले अंधारात
वन्यजीवचे पीसीसीएफ महिप गुप्ता हे सेवानिवृत्त झाल्यापासून ते पद रिक्त आहे. मात्र, या पदाचे डिमोशन करून विवेक खांडेकर या दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्याकडे ‘टायगर’ची कमान सोपविली आहे. वास्तविकत: सामाजिक वनीकरणाचे पीसीसीएफ हे पद दुय्यम दर्जाचे करणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. याविषयी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अंधारात ठेवून हा प्रताप केला आहे. तर वनमंत्र्यांच्या जिल्ह्यातच सर्वाधिक वाघांची दहशत पसरलेली आहे.

Web Title: 'Demotion' of tigers in Maharashtra; Neglect of the State Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ