डेंग्यू : १० हजार गृहभेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:14 PM2018-07-22T23:14:36+5:302018-07-22T23:15:06+5:30

डेंग्यूचा वाढता प्रकोप व आ. रवि राणा यांनी आयुक्तांना दिलेली तंबी पाहता, महापालिका यंत्रणा सुटीच्या दिवशी खडबडून जागी झाली. महापालिकेच्या पथकाने डेंग्यू नियंत्रणासाठी रविवारी शहरातील सुमारे ९ ते १० हजार घरांना भेटी दिल्या.

Dengue: 10 thousand homeless | डेंग्यू : १० हजार गृहभेटी

डेंग्यू : १० हजार गृहभेटी

Next
ठळक मुद्देपथकाकडून तपासणीस प्रारंभ : वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पर्यवेक्षणाची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : डेंग्यूचा वाढता प्रकोप व आ. रवि राणा यांनी आयुक्तांना दिलेली तंबी पाहता, महापालिका यंत्रणा सुटीच्या दिवशी खडबडून जागी झाली. महापालिकेच्या पथकाने डेंग्यू नियंत्रणासाठी रविवारी शहरातील सुमारे ९ ते १० हजार घरांना भेटी दिल्या. अनेक घरातील साचलेले पाणी रिकामे करण्यात आले. जे पाणीसाठे रिकामे करता येत नाहीत, तेथे ‘टॅमिफॉस’ हे कीटकनाशक टाकण्यात आले, तर तापाने आजारी असलेल्या रुग्णांचे रक्तनमुने संकलित करण्यात आले.
पार्वतीनगर परिसरातील ४०८ घरांना रविवारी भेटी देण्यात आल्या. त्या भागात ४९ ठिकाणी दूषित पाणी आढळून आले तथा तापाचे २८ रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. 'डेंग्यू : अमरावतीकर भयभीत' या मथळ्याखाली 'लोकमत'ने पार्वतीनगरवासीयांच्या वेदना लोकदरबारी मांडल्या. त्याची दखल घेत आ. राणा यांनी शनिवारी डॉ. मनोज निचत रुग्णालयातील डेंग्यू रुग्णांची भेट घेतली तथा संपूर्ण शहरात तातडीच्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या. डेंग्यूने रुग्ण दगावल्यास महापालिका प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या आदेशाने वैद्यकीय आरोग्य अधिकाºयांनी १३ शहरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर इंचार्जच्या नेतृत्वात पथकांचे गठण केले. या शहरी आरोग्य केंद्राने प्रत्येकी पाच ते सहा पथकांची निर्मिती केली.

डासांची उत्पत्तिस्थळे निष्कासित
पथकाने रविवारी ९ ते १० हजार घरांना भेटी देऊन डासांची उत्पत्तिस्थळे निष्कासित करून तापाच्या रुग्णांची नोंद घेतली. हैदरपुरा शहरी आरोग्य केंद्राने ५९६ घरांना भेटी दिल्या. त्यात ४३ तापाचे रुग्ण आढळून आले, तर १३ जणांचे रक्तनमुने घेण्यात आले. ५९ दूषित कंटेनर रिकामे करण्यात आले, तर दोन ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले. विलासनगर आरोग्य केद्राच्या अखत्यारीत येणाºया ३६९ घरांना भेटी देण्यात आल्या. त्या भागात २५ तापाचे रुग्ण आढळले. तेथील ११४३ पैकी ६४ भांड्यांमध्ये डासअळी आढळून आल्या. जिल्हा सामान्य रुग्णालय या शहरी आरोग्य केंद्रांतर्गत रविवारी ३३८९ घरांना भेटी देण्यात आल्या. आ. राणा यांच्या भेटीदरम्यान डॉ. निचत यांच्या रुग्णालयात पंधरवड्यात तब्बल ६३ रुग्ण डेंग्यूबाधित आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. याशिवाय अन्य खासगी रुग्णालयही डेंग्यू रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे उघड झाले. ही सर्व परिस्थिती पाहता डेंग्यूवरील उपाययोजनेला महापालिकेकडून युद्धस्तरावर सुरुवात करण्यात आली. महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील पार्वतीनगरात सर्वाधिक डेंग्यूसंशयित रुग्ण आढळून आल्याच्या अनुषंगाने आता या भागातील पर्यवेक्षणासाठी एक पथक तयार करण्यात आले असून, त्याची जबाबदारी वैद्यकीय अधिकारी देवेंद्र गुल्हाने यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. आशा, स्वच्छता कामगार व आरोग्य कर्मचाºयाच्या पथकाने रविवारी या भागातील ४०८ घरांना भेटी दिल्या. ‘लोकमत’च्या वृताची दखल घेत आयुक्त निपाणे यांनी शनिवारी सकाळी १० वाजता वैद्यकीय अधिकाºयांची तातडीने बैठक बालावून अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला होता, हे विशेष.

अतिशीघ्र पथकांची निर्मिती
डेंग्यू आणि अन्य कीटकजन्य आजारांना आळा घालण्याच्या दृष्टीने अतिशीघ्र पथके तयार करण्याचे आदेश स्त्री वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर इन्चार्ज यांना देण्यात आले. महापालिका क्षेत्रातील १३ शहरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांकडे ही जबाबदारी देण्यात आली. प्रत्येक पथकात दोन आशा, दोन सफाई कामगार, प्रत्येकी एक परिचारिका आणि एमपीडब्ल्यू (मल्टिपर्पझ वर्कर) चा समावेश आहे. चार ते पाच घरानंतर या पथकाला सेल्फी घेऊन वरिष्ठांना पाठविणे बंधनकारक आहे.
उपमहापौरांच्या प्रभागातही डेंग्यूसंशयित रुग्ण
पार्वतीनगरपाठोपाठ आपल्याही प्रभागात काही डेंग्यूसंशयित रुग्ण आढळल्याची माहिती उपमहापौर संध्या टिकले यांनी रविवारी प्रशासनाला दिली. टिकले यांनी आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्यासमवेत दस्तुरनगर व लगतचा परिसराची पाहणी केली. प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश दिले. नैताम यांनी दस्तुरनगरसह यशोदानगर, महादेवखोरी, कॅम्प, राजापेठ, प्रशांतनगर आदी भागाची पाहणी करून डेंग्यू नियंत्रणासाठी अधिनस्थ यंत्रणेला बजावले.
अशी आहे पर्यवेक्षणाची जबाबदारी
दैनंदिन गृहभेटी, जलद ताप सर्वेक्षण, तापाचे रुग्ण शोधणे, तापाचे रुग्णांचे रक्तनमुने घेऊन तपासणीसाठी पाठविणे, घरातील पाणी साठ्यांची तपासणी करणे, दूषित आढळून आलेली पाणीसाठे त्वरित रिकामे करून घेणे, आरोग्य शिक्षण अशा बाबींवर नियमितपणे कार्यवाही करण्याची जबाबदारी वैद्यकीय अधिकाºयांकडे देण्यात आली आहे. या कामाच्या पर्यवेक्षणासह स्वच्छतेची पाहणी करून आरोग्य व स्वच्छताविषयक कामाचा दैनंदिन अहवाल वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालयाला दररोज सायंकाळी ५ वाजेपर्यंत न चुकता सादर करावा लागणार आहे. या कामांमध्ये हयगय होणार नाही, याची दक्षतासुद्धा घ्यावी लागणार आहे. पार्वतीनगर भागाची जबाबदारी डॉ. देवेंद्र गुल्हाने यांच्याकडे देण्यात आली आहे.

Web Title: Dengue: 10 thousand homeless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.