डेंग्यू : अमरावतीकर भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 11:04 PM2018-07-20T23:04:19+5:302018-07-20T23:04:55+5:30
'टायगर मॉस्किटो' नावाने ओळखल्या जाणाºया ‘इडिस इजिप्त’ डासांमुळे होणाऱ्या डेंग्यूने शहरात पाय पसरविले असून, अकोली रोड स्थित पार्वतीनगरात तर या आजाराने कहरच केला आहे. बऱ्याच घरातील नागरिक डेंग्यूने बाधित झाल्याने येथे भीतीचे वातावरण आहे.
वैभव बाबरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : 'टायगर मॉस्किटो' नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘इडिस इजिप्त’ डासांमुळे होणाऱ्या डेंग्यूने शहरात पाय पसरविले असून, अकोली रोड स्थित पार्वतीनगरात तर या आजाराने कहरच केला आहे. बऱ्याच घरातील नागरिक डेंग्यूने बाधित झाल्याने येथे भीतीचे वातावरण आहे.
पार्वतीनगरातील काही घरांमध्ये अर्धेअधिक सदस्य डेंग्यूबाधित झाले असून, महापालिका प्रशासनाकडून आता प्रतिबंधात्मक हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या महिन्याभरापासून पार्वतीनगरातील बहुंताश घरातील नागरिक ताप आजाराच्या विळख्यात आहेत. ताप बरा होत नसल्याचे पाहून अनेकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तनमुन्यांची तपासणी केली. त्यामध्ये अनेकांना डेंग्यूची लागण असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. काही नागरिकांची मुलांना तर नागपूरला हलविण्याची वेळ आली आहे. मंगेश सहदेव तायडे यांचा मुलगा वंश याला डेंग्यूची लागण झाली आहे. त्याच्यासह परिसरातील आणखी दोन जणांवर सद्यस्थितीत नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तायडे यांच्या कुटुंबातील कौस्तुभ हा डेंग्यूच्या तावडीतून नुकताच सुटला आहे. गेल्या महिन्याभरापासून डेंग्यूचा कहर असताना, आता महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. तीन ते चार दिवसांपासून महापालिकेच्या आरोग्य विभागातील काही महिलांनी डेंग्यूबाधितांच्या घरी जाऊन चौकशी केली. त्यानंतर गप्पी मासे व फवारणीची प्रक्रिया सुरू केली आहे. इतके असतानाही नागरिकांच्या मनात डेंग्यूविषयी भीती कायमच आहे.
डेंग्युची उत्पत्ती होते कशी
चांगल्या पाण्यात उत्पत्ती करणारे डेंग्यूचे डास दिवसाच चावतात. उन्हाळ्याच्या सरतेशेवटी दाहकता कायम असताना अनेकांच्या घरातील कूलर सुरू असतात. त्या पाण्यात डेंग्यूची उत्पत्ती होण्याची दाट शक्यता असते. याशिवाय थोड्याफार प्रमाणात पाऊस पडल्यानंतर घरावर पडून असणाऱ्या टाकाऊ वस्तंूमध्येही पाणी साचते. त्या पाण्यात डेंग्यूच्या डांसाची उत्पत्ती होते. त्यामुळे या टाकाऊ वस्तूंमधील साचलेले पाणी त्वरित फेकणे आवश्यक असते.
गोरलेकडील शौचालयाच्या टाक्यात आढळले डास
पार्वतीनगरातील डेंग्यूचा कहर पाहता, आता नागरिक सतर्क झाले आहेत. तेथील रहिवासी संदेश गोरले यांनी डास उत्पत्तिस्थानाची तपासणी केली असता, त्यांना शौचालयाच्या टाक्यात डास आढळून आले. त्या डासांचे निरीक्षण केल्यानंतर ते डेंग्यूचे असल्याची शहानिशा संदेश गोरले यांनी गुगलवर केली.
पार्वती नगरातील बहुतांश घरांमध्ये नागरिकांना डेंग्यूची लागण झाली आहे. या आजारासंदर्भात पुरेपूर माहिती नसल्यामुळे काळजी घेतली नाही. महापालिकेने आता दखल घेतली आहे.
- वेणुताई जाधव, पार्वतीनगर
डेंग्यू आजाराबद्दल काहीच माहिती नव्हते. आमच्या घरातील दोघांना डेंग्यूची लागण झाली आहे. एक नातू उपचारानंतर बरा झाला असून, आणखी एका नातवावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत
- शशिकला तायडे, पार्वतीनगर
पार्वतीनगरात बºयाच जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचलेले आहे. अस्वच्छता आहे. तण वाढले आहे. रिकाम्या जागेत पाणी साचले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच आजार पसरत आहे.
- आशीष बिजवे, पार्वतीनगर