जिल्ह्यात डेंग्यू तपासणी लॅब आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 10:13 PM2017-10-09T22:13:59+5:302017-10-09T22:14:29+5:30
डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात डेंग्यू तपासणी केंद्र उभारण्यात यावे, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात डेंग्यू तपासणी केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे. ठाकूर यांच्या संदर्भिय पत्रानुसार, पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सुद्धा अमरावती डेंग्यूरोग परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत, असे पत्र आरोग्य मंत्री दीपक सावंत यांना पाठविले आहे.
अमरावती हे विभागीय मुख्यालयाचे ठिकाण असून येथे जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय व सुपर स्पेशालिटी, अशी तीन मोठी शासकीय रुग्णालय आहे. या रुग्णालयात जिल्हाबाहेर रुग्णांची मोठी गर्दी असते. मागील काही दिवसांत अमरावती जिल्ह्यात डेंग्यू रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. मात्र डेंग्यूचे निदान करण्यासाठी तपासणी केंद्र वजा प्रयोगशाळा नसल्याने वेळीच तपासणी होत नाहीत व रुग्ण दगावतात. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये होत असलेली वाढ आणि अमरावतीमध्ये नसलेली लॅब हे पाहता संबंधित रुग्णांचे रक्तजल नमुने यवतमाळ येथे पाठवावे लागतात. ग्रामीण भागातील रुग्णांना तपासणीकरिता यवतमळ येथे जावे लागत असल्याने रुग्णाला प्रवास खर्च व इतर त्रासाचा सामाना करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय होवू नये, यासाठी अमरावती येथे डेंग्यूचे परीक्षण करणारी प्रयोगशाळा उभारण्यात यावी, अशी विनंती आमदार ठाकूर यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना ५ आॅक्टोबरला पाठविलेल्या पत्रातून केली आहे.
पालकमंत्री पोटे पाटलांचाही पाठपुरावा
पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी ४ आॅक्टोबरला आरोग्यमंत्र्यांच्या नावे पत्र लिहून अमरावती येथे डेंग्यूरोग परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्याबाबत पाठपुरावा केला आहे. यवतमाळ येथून अहवाल येण्यास विलंब लागत असल्याने बºयाच रुग्णांना जीव गमवावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर ही प्रयोगशाळा अत्यंत गरजेची असल्याचे पालकमंत्र्यांनी म्हटले आहे.