डेंग्यूने तरुणाचा मृत्यू; चार रुग्णांवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 10:30 PM2017-09-05T22:30:49+5:302017-09-05T22:32:18+5:30
शहरातील एका तरूणाचा डेंग्यू आजाराने नागपूर येथील रूग्णालयात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील एका तरूणाचा डेंग्यू आजाराने नागपूर येथील रूग्णालयात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. अमरावती शहरात डेंग्यूचा शिरकाव झाला असून शहरातील विविध खासगी रूग्णालयांमध्ये सद्यस्थितीत चार रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अक्षय झोपाटे (२४,रा.रेखा कॉलनी, कठोरा नाका) असे मृताचे नाव आहे. ३१ आॅगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला.
अक्षय झोपाटे हा पुणे येथील एका खासगी कंपनीत कार्यरत होता. १५ दिवसांपूर्वी अमरावतीत आला असता तो तापाने फणफणला. त्याला अमरावतीमधील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचे रक्तजल नमुने प्रयोगशाळेत तपासल्यानंतर ते पॉझिटिव्ह आलेत. पुण्याहूनच त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे डॉक्टरांच्या तपासणीत निष्पन्न झाले. त्या रूग्णालयात एक दिवस उपचार घेतल्यानंतर त्याला गंभीर अवस्थेत नागपूरला हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा सोमवारी मृत्यू झाला. अमरावतीत स्वाईन फ्लू प्रमाणेच आता डेंग्यूदेखील पाय पसरवू लागला असून मागील काही दिवसांमध्ये विविध खासगी रूग्णालयांमध्ये डेंग्यूचे रूग्ण आढळून येत आहेत. महापालिकेच्या नोंदीनुसार पाच संशयित रूग्णांचे रक्तजल नमुने यवतमाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. मात्र, खासगी डॉक्टरांनी डेंग्यूसंदर्भात उपचार सुरू केले आहेत.
नागरिकांनी अशी घ्यावी काळजी
डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती ही स्वच्छ पाण्यातच होते. त्यामुळे फुलदाणी, माठ, रांजण, पिंप, टाक्या, हौद, टायर्स, फुटलेल्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, फ्लॉवर पॉट, पाण्याची भांडी, कुलर्समध्ये पाणी साचू देऊ नका. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा. आठवड्यातून एकदा भांडी स्वच्छ करा, साठवलेले पाणी आठवड्यातून एकदा तरी बदलून भांडी कोरडी करा. टाकाऊ वस्तू व साहित्यांची विल्हेवाट लावा. पाण्याच्या टाक्यांवर झाकणे बसवा. मच्छरदाणी किंवा मॉस्क्युटो रिप्लंट वापरावे.
लक्षणे
डेंग्यू या आजारात ताप येतो. तो १०४ फॅ अंशत: असू शकतो. डोकेदुखी
स्नायू, अस्थी आणि सांधेदुखी, मळमळ, उलट्या, डोळ्यांमागे वेदना अशी लक्षणे यामध्ये दिसून येतात.
‘स्वाईन फ्लू’चा आणखी एक पॉझिटिव्ह रूग्ण
अमरावती शहरात ‘स्वाईन फ्लू’ने आतापर्यंत १४ जणांचे बळी गेले आहेत, तर ५० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार झाले आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क असतानाही स्वाईन फ्लूचा प्रसार वाढतच आहे. संशयित रुग्ण दाखल होण्याचा ओघ सुरुच आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत पाठविलेला स्थानिक कृष्णार्पण कॉलनीतील एका २७ वर्षीय तरुणीचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे. ती तरुणी दिल्लीहून अमरावतीत आली. तीव्र ताप असल्यामुळे तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर टॅमी फ्ल्यूद्वारे उपचार सुरू आहेत.
अक्षय झोपाटे नामक रुग्णाला आमच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्याला नागपूरला हलविण्यात आले. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सद्यस्थितीत आमच्या रुग्णालयात चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. डासांपासून होणाºया या आजाराबाबत नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे.
-रोहन काळमेघ,
ह्यदयरोग व मधुमेह तज्ज्ञ,
डेंग्यूचे काही संशयित रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांचे रक्तजल नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेत. नागरिकांनी घराच्या आवारात पाणी साचू देऊ नये. स्वच्छ पाण्यातच डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. टाकाऊ वस्तुंमध्ये पाणी साचले असेल तर ते त्वरित फेकावे.
- सीमा नैताम,
वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका