डेंग्यूचा हैदोस, पालकमंत्र्याद्वारा झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 01:30 AM2018-08-24T01:30:35+5:302018-08-24T01:31:14+5:30
शहरात डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपाबाबत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गुरुवारी महापालिका आयुक्तांसह आरोग्य अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. डेंग्यू नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवा, अशी तंबी त्यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपाबाबत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गुरुवारी महापालिका आयुक्तांसह आरोग्य अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. डेंग्यू नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवा, अशी तंबी त्यांनी दिली. नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत डेंग्यू नियंत्रण कार्यक्रम, साद्र्राबाडी येथील भूकंपसदृश घटनेचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी आ. सुनील देशमुख, आ. प्रभुदास भिलावेकर, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, महापालिका आयुक्त संजय निपाणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले आदी उपस्थित होते.
कीटकजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी सर्वत्र स्वच्छता, पाणीसाठ्याची तपासणी, फवारणी, धूरळणी आदी कार्यक्रमांत सातत्य ठेवावे. रुग्णांच्या उपचारासाठी पुरेसा औषधसाठा जिल्ह्यात सर्वत्र उपलब्ध करण्यासोबत डेंग्यू प्रतिबंधाविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.