डेंग्यूचा संसर्ग तीव्र, १६ दिवसांत १९ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:41 PM2017-10-17T23:41:05+5:302017-10-17T23:42:17+5:30
१९ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर या कालावधीत तापाने आजारी असलेल्या ६० रुग्णांचे रक्तजल नमुने घेण्यात आले होते.
अमारवती : १९ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर या कालावधीत तापाने आजारी असलेल्या ६० रुग्णांचे रक्तजल नमुने घेण्यात आले होते. यापैकी १९ रक्तजल नमुने डेंग्यूदूषित अर्थात पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. केवळ १६ दिवसांत १९ रुग्णांना अर्थात प्रत्येक दिवशी दाखल झालेल्या कमाल चार रुग्णांपैकी एकाला डेंग्यूची बाधा झाल्याचे अधिकृतरीत्या उघड झाले आहे. शहरातील एकाएका खासगी दवाखान्यामध्ये डेंग्यूचे सरासरी ७ ते १० रुग्ण दाखल असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. यावरून डेंग्यूची साथ तीव्र होत असल्याचेही स्पष्ट झाले
विशेष म्हणजे, जानेवारी ते १९ सप्टेंबरपर्यंत केवळ सात रुग्णांना डेंग्यूची बाधा झाल्याचा दावा महापालिका यंत्रणेने केला होता. यवतमाळ येथील सेंटिनल सेंटरमधून प्राप्त झालेल्या रक्तजल नमुन्यांचा हवाला त्यासाठी देण्यात आला. जिल्ह्यात डेंग्यूने कुणाचाही मृत्यू झाला नाही. डेंग्यू आटोक्यात असल्याचा दावा या आकडेवारीवरून करण्यात आला होता; मात्र त्यानंतर ४ आॅक्टोबरपर्य$ंत पाठविलेल्या रक्तजल नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर हा आकडा ७ वरून २६ वर पोहोचला आहे. ५ ते १६ आॅक्टोबरदरम्यान पाठविलेल्या ४२ रक्तजल नमुन्यांचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. पाठविलेल्या रक्तजल नमुन्यांच्या तुलनेत सरासरी २६ टक्के रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे ज्या ४२ रक्तजल नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. त्यातील १० रुग्ण डेंग्यूबाधित येण्याची शक्यता नाकारता येत नाही. १ ते १६ आॅक्टोबर या कालावधीत शहरातील विविध खाजगी रुग्णालायात दाखल असलेल्या ६० रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी यवतमाळला पाठविण्यात आले आहे.
या परिसरातील रुग्णांना बाधा
१९ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर या कालावधीत खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या ज्या १९ रुग्णांचे रक्तजल नमुने डेंग्यूदूषित आढळून आलेत, ते रुग्ण नारायणनगर, जयंत कॉलनी, कल्याणनगर, वडाळी, मोतीनगर, श्यामनगर, प्रशांतनगर, गाडगेनगर, दानिश कॉलनी, श्यामनगर, किशोरनगर, किरणनगर, एलआयसी कॉलनी, विमलनगर, जलारामनगर, अंबाविहार, फ्रेजरपुरा व गोपालनगरातील रहिवासी आहेत.
'त्या' नऊपैकी दोन पॉझिटिव्ह
राजापेठ स्थित डॉ. मनोज निचत यांच्या रुग्णालयात ४ आॅक्टोबरपर्यंत नऊ रुग्णांची डेंग्यूच्या निदानासाठी करण्यात आलेली ‘एनएस १ अॅन्टीजेन’ ही चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यापैकी चार रुग्ण ग्रामीण भागातील, तर पाच रुग्ण महापालिका क्षेत्रातील होते. त्यापैकी जलारामनगर येथील २९ वर्षीय महिला व गोपालनगर येथील ३५ वर्षीय महिला डेंग्यूबाधित आढळून आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.