मोर्शी शहरात डेंगूचा प्रकोप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:17 AM2021-08-20T04:17:15+5:302021-08-20T04:17:15+5:30
मोर्शी : शहर ग्रामीण भागात सध्या डेंगूसदृश्य आजाराचे थैमान असून वाॅर्ड क्र. १३ मधील अस्वच्छता व डासांचा उद्रेक डेंगू ...
मोर्शी : शहर ग्रामीण भागात सध्या डेंगूसदृश्य आजाराचे थैमान असून वाॅर्ड क्र. १३ मधील अस्वच्छता व डासांचा उद्रेक डेंगू आजाराला कारणीभूत ठरत असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष शेख बशीर शेख शब्बीर ऊर्फ गोलू शेख यांनी केला आहे.
मोर्शी तालुक्यात दिवसेंदिवस डेंग्यूचे रुग्ण वाढत असून प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. वाॅर्ड क्र. १३ येथे मुस्लिम जनसमुदाय मोठ्या प्रमाणात असून तेथे कोणत्याही प्रकारची कीटकनाशक फवारणी तसेच नाल्यांची साफसफाई करण्यात न आल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना डेंगूसदृश्य आजाराची लागण होत आहे. नाल्या-गटारी तुडुंब भरली असून परिसरात झाडेझुडपे गाजर गवत वाढलेले आहे. नुकताच कोरोनाचा उद्रेक कमी झाला असताना आता घरोघरी डेंग्यूचे रुग्णाचे प्रमाण वाढल्याने नागरिक धास्तावले आहे. नगर परिषदेतर्फे महिन्यातून एकदा थातूरमातूर फवारणी केली जात आहे. प्रभावी उपाययोजना करण्यात मात्र नगर परिषद प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी व आरोग्य विभागाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन नाल्यांची साफसफाई व फवारणी करण्यात यावी, अशी मागणी प्रभाग युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष गोलू शेख यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनातून केली आहे.
विचोरी प्रा.आ. केंद्रात रुग्णांचा संघर्ष
मोर्शी तालुक्यातील विचोरी प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या अंतर्गत उपकेंद्रात आरोग्य सेविका व डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णांना मात्र जीवन- मरणाशी संघर्ष करावा लागत आहे. तरीसुद्धा जिल्हा आरोग्य अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप शिवसेनेचे माजी उपतालुका प्रमुख किशोर गांगडे यांनी केला आहे. सध्या मोर्शी तालुक्यात डेंग्यूसदृश या आजाराने थैमान घातले असतांना विविध तापाच्या साथीचे आजार आबालवृद्धांना होत आहे. नियोजनाअभावी ग्रामीण भागात प्राथमिक स्वास्थ्य केंद्र असून सुद्धा उपचार मिळत नाही. ग्रामीण भागातील रुग्णांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी किशोर गांगडे, कैलास गडम, प्रदीप टिकले, अतुल शेंद्रे, अमोल शेंद्रे, मोहन धोटे, अश्विन प्रधान आदींनी केली आहे.