डेंग्यू रुग्णांच्या वसाहतींचे ‘स्पॉट मॅपिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:40 PM2018-08-25T22:40:29+5:302018-08-25T22:41:22+5:30
राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या आदेशान्वये महापालिका क्षेत्रातील डेंग्यूबाधित रुग्णांचे स्पॉट मॅपिंग करण्यात आले आहे. याशिवाय एसओपी ‘स्टँडर्ड आॅपरेटिंग प्रोसिजर’ अंतर्गत बुकलेट तयार करण्यात आले असून, त्यात आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची माहिती संकलित केली जात असल्याची माहिती उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या आदेशान्वये महापालिका क्षेत्रातील डेंग्यूबाधित रुग्णांचे स्पॉट मॅपिंग करण्यात आले आहे. याशिवाय एसओपी ‘स्टँडर्ड आॅपरेटिंग प्रोसिजर’ अंतर्गत बुकलेट तयार करण्यात आले असून, त्यात आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची माहिती संकलित केली जात असल्याची माहिती उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी दिली.
१ जानेवारी ते २२ आॅगस्ट या कालावधीत जे ७९ रुग्ण डेंग्यूबाधित आढळून आलेत, ते ज्या परिसरातील रहिवासी होते, त्या भागासह अन्य कुठला भागात डेंग्यूची ‘घनता’ अधिक आहे, कोणता परिसर अधिक संवेदनशील आहे, त्याबाबतचा एसओपी आपल्याकडे आहे का, अशी विचारणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांना केली होती. तथापि, त्या उत्तर देऊ शकल्या नव्हत्या. अन्य महापालिकांकडून ती माहिती घेऊन एसओपी तयार करण्याचे निर्देश ना. पाटील यांनी दिले होते. बरहुकूम एसओपी आणि स्पॉट मॅपिंग करण्यात आले. जानेवारी ते २२ आॅगस्ट या कालावधीत ज्या ९६२ डेंग्यू संशयित आढळून आलेत, ते ज्या भागातील रहिवासी आहेत, तो परिसर मॅपिंगमध्ये चिन्हांद्वारे अंकित करण्यात आला. दरम्यान, महापालिका क्षेत्रातील सुमारे ७० फिजिशियन व बालरोगतज्ज्ञांना डेंग्यूसंशयित रुग्णांच्या ट्रिटमेंट पेपरच्या छायाप्रति मागविण्यात आल्या आहेत. जुलै व आॅगस्ट या कालावधीत उपचाराकरिता दाखल महापालिका क्षेत्रातील डेंग्यूसंशयितांची संपूर्ण कागदपत्रे व चाचण्यांचा अहवाल रुग्णनिहाय स्वतंत्र तीन दिवसांत पुरवावे, असे पत्र वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडून पाठविण्यात आले आहे. शहरी आरोग्य केद्रांमार्फत हे पत्र पाठविण्यात येणार आहेत. ती माहिती त्या स्तरावर संकलित केली जाईल.
चैतन्य कॉलनी, दस्तुरनगर अतिसंवेदनशील
जानेवारी ते आॅगस्टपर्यंत जे ७९ रुग्ण डेंग्यूबाधित आढळून आलेत, त्यापैकी सहा चैतन्य कॉलनी व चार दस्तुरनगर परिसरातील रहिवासी आहेत. त्यामुळे हा भाग अतिसंवेनशील ठरविण्यात आला आहे. देशपांडे लेआउट, वैशालीनगर, अमर कॉलनी, उत्मतनगर, अंबा कॉलनी, साईनगर व यशोदानगर भागातील प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे. शहरातील विविध वसाहतींमध्ये एकेक रुग्ण आढळून आला. त्या संपूर्ण परिसराचे एका मोठ्या नकाशावर स्पॉट मॅपिंग करण्यात आले.
आज फवारणी
महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या ६४ शाळांमध्ये रविवारी धूरळणी व फवारणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त संजय निपाणे यांनी शनिवारी दिले. आरोग्य विभाग व शिक्षण विभाग यांना सदर धूरळणी व फवारणीचा कार्यक्रम संयुक्त राबवून त्यांचा अहवाल महापालिका आयुक्तांना सादर करावयाचा आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने शिक्षणाधिकाऱ्यांना कळविले आहे.
महापालिका आयुक्तांचा प्राचार्य, मुख्याध्यापकांशी संवाद
महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी रविवारी तखतमल इंग्रजी हायस्कूल, दीपा इंग्रजी प्राथमिक शाळेला भेट दिली. तेथील प्राचार्यांसोबत डेंग्यूबाबत चर्चा केली. सोबतच त्यांनी साईनगर परिसराची पाहणी केली. उपाययोजनांतर्गत ज्या ठिकाणी धूरळणी व फवारणी सुरू आहे, त्या कामांचा आढावा घेत त्यांनी नागरिकांशी चर्चा केली. प्रतिबंध हाच उपचार असल्याचे यावेळी नागरिकांना त्यांनी सांगितले. ज्या नागरिकांना साथरोगाविषयी माहिती आहे, त्यांनी ती माहिती परिसरातील इतर नागरिकांनाही समजावून सांगण्याचे आवाहन केले. आयुक्तांनी या परिसरातील दूषित कंटेनर (पाण्याचे साठे) नष्ट करण्याचे नागरिकांना सूचित केले. ज्या ठिकाणी दूषित कंटेनर आढळले, ते त्वरित त्यावेळी नष्ट करण्यात आले व सदर परिसरात फवारणी व धूरळणी करण्यात आली. या परिसरातील अनेक घरांना त्यांनी भेटी दिल्या.
डेंग्यूचा आणखी एक बळी
अमरावती : शहरात शुक्रवारी सकाळी एका युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाला. सुमीत श्रीकृष्ण गोटेफोडे (२६ रा. सातुर्णा) असे सदर मृत युवकाचे नाव असून, तो येथील कॅम्प स्थित दयासागर हॉस्पिटलमध्ये तो उपचार घेत होता. डेंग्यूच्या निंदणासाठी उपयुक्त असलेली एनएस-वन ही चाचणी पॉझिटिव्ह निघाली होती, असे दयासागर रूग्णालयाच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले.
ताप असल्याने सुमीतला २० आॅगस्ट रोजी उपचारासाठी दयासागर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच दिवशी रक्तनमुन्याची चाचणी घेण्यात आली. परंतु, प्रकृती बिघडल्याने शुक्रवारी तो दगावला. त्याला डेंग्यू तसेच हेपॅटायटीस-ए (कावीळ) झाला होता तसेच प्लेटलेट ४५ हजार झाले होते, अशी माहिती येथील डॉ. एस. रचिता यांनी दिली. याच रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांत डेंग्यूच्या एनएस-वन व इतर चाचणीचे ६० पेक्षा जास्त पॉझिटिव्ह आढळले होते. या ठिकाणी उपचारानंतर ते रू ग्ण बरे झाल्याची माहिती अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टर रंजना तेरेसे यांनी दिली होती.