डेंग्यू : राणांची आयुक्तांना तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:13 PM2018-07-21T23:13:20+5:302018-07-21T23:14:37+5:30

एकाच रुग्णालयात पंधरवड्यात ६३ डेंग्यू रुग्ण आढळणे ही साथ नसून महामारीची लक्षणे आहेत. त्या महामारीला महापालिका जबाबदार असल्याचे बजावत आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांचा पदभार काढण्याचे निर्देश आ. रवि राणा यांनी महापालिका आयुक्तांना दिले.

Dengue: RAN compositions rebuff | डेंग्यू : राणांची आयुक्तांना तंबी

डेंग्यू : राणांची आयुक्तांना तंबी

Next
ठळक मुद्देआमदार रुग्णांच्या भेटीला : डॉ. सीमा नैताम यांच्यावर कारवाईचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एकाच रुग्णालयात पंधरवड्यात ६३ डेंग्यू रुग्ण आढळणे ही साथ नसून महामारीची लक्षणे आहेत. त्या महामारीला महापालिका जबाबदार असल्याचे बजावत आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांचा पदभार काढण्याचे निर्देश आ. रवि राणा यांनी महापालिका आयुक्तांना दिले.
डेंग्यूने रुग्णाचा मृत्यू झाल्यास महापालिका प्रशासनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची तंबी त्यांनी आयुक्तांना दिली. शनिवारी सायंकाळी आ. राणा यांनी डॉ. मनोज निचत यांच्या रुग्णालयात दाखल डेंग्यू रुग्णांची भेट घेतली. त्यावेळी महापालिका आयुक्त संजय निपाणे त्यांच्यासमवेत होते. तेथील डेंग्यू रुग्णांची स्थिती पाहून राणा संतापले. शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालविला का, अशी संतप्त विचारणाही आयुक्तांना केली.
लोकमत’ने शनिवारी ‘डेंग्यू : अमरावतीकर भयभित’ मथळ्याखाली प्रकाशित वृत्तातून पार्वतीनगर परिसरातील डेंग्यूच्या साथीवर प्रकाशझोत टाकला. त्या पार्श्वभूमिवर शनिवारी राजापेठ उड्डाणपुलाची पाहणी केल्यानंतर आ.राणा आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांना घेऊन डॉ. मनोज निचत यांच्या श्रीकृष्ण हॉस्पिटल’मध्ये पोहोचले. त्यांनी डॉ. निचत यांच्याकडून डेंग्यूची चाचणी व रुग्णांबाबत माहिती जाणून घेतली. आपल्या रुग्णालयात पंधरवड्यात ६३ डेंग्यू रुग्ण उपचारार्थ दाखल झालेत. ते ६३ रुग्ण डेंग्यूसंशयित नसून, त्यांना डेंग्यूची बाधा झाल्याची माहिती निचत यांनी दिली. त्यावर त्यांनी आरोग्य अधिकारी सीमा नैताम व आयुक्त संजय निपाणे यांना जाब विचारला.
- तर सदोष मनुष्यवधाची तक्रार
एकाच रुग्णालयात ६३ डेंग्यू रुग्ण असतील तर महापालिका प्रशासन कुठल्या आधारे डेंग्यूरुग्ण नसल्याचा दावा करते, असा सवाल त्यांनी नैताम यांना केला. त्यावर आम्ही निचत यांचा दावा नाकारत नसून, यवतमाळच्या सेंटिनल सेंटरमधून आम्हाला अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत ते रुग्ण आमच्या लेखी संशयित असल्याची माहिती नैताम यांनी दिली. नैताम यांच्या माहितीने राणा यांचे समाधान झाले नाही. शहरात मोठ्या प्रमाणात डेंंग्यूचे रुग्ण आढळून येत असताना रुग्ण नसल्याचा दावा करणे म्हणजे जबाबदारी झटकणे होय, अशा शब्दांत राणा यांनी नैताम यांना फटकारले. त्यांनी रुग्णांची भेट घेऊन ते कुठल्या परिसरातील आहेत, त्यांना केव्हा बाधा झाली, ही विचारणा केली. भेटीदरम्यान त्यांनी आयुक्तांशी चर्चा करून अस्वच्छता व डेंग्यूच्या साथीला जबाबदार असलेल्या आरोग्य अधिकाºयांवर कारवाई करण्याचे सूचित केले. याशिवाय डेंग्यूने रुग्ण दगावल्यास महापालिका प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची तंबी राणांनी यावेळी दिली. केवळ डेंग्यू रुग्ण आढळले त्या परिसरातच नव्हे, तर संपूर्ण शहरात प्रभावी मोहीम राबविण्यासह संपूर्ण शहरात डासमुक्तीसाठी फवारणीची सूचना त्यांनी केली.

नियंत्रणासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’
महापालिकेत बैठक : वैद्यकीय पथके गठित

अमरावती : डेंग्यू रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होत चाललेली वाढ लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ बनविला आहे. त्याअंतर्गत पार्वतीनगरसह अन्य भागासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पथके गठित करण्यात आली आहेत. या पथकासोबत फॉगिंग फवारणी करणारे कर्मचारीही असतील.
शुक्रवारी युवक काँग्रेसने केलेले आंदोलन आणि ‘डेंग्यू : अमरावतीकर भयभित’ या ‘लोकमत’च्या वृत्ताच्या पार्श्वभूमिवर महापालिकेत शनिवारी सकाळी १० वाजता महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली. त्यात आयुक्त संजय निपाणे यांनी डेंग्यू नियंत्रणासाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला.
गृहभेटींवर भर
या बैठकीला उपायुक्त नरेंद्र वानखडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम, डॉ.जयश्री नांदूरकर, डॉ.भाग्यश्री सोमाणी, डॉ.अजय जाधव, डॉ.स्वाती कोवे, डॉ.पौर्णिमा उघडे, कार्यकारी अभियंता रवींद्र पवार व सुहास चव्हाण आणि जिल्हा मलेरिया अधिकारी कार्यालयातील आरोग्य सहायक उपस्थित होते. त्यात पार्वतीनगरला आढळलेल्या डेंग्यू संशयितांसह ज्या रुग्णांचे रक्तजलनमूने घेण्यात आलीत, त्याबाबत आढावा घेण्यात आला. त्या भागातील डासांची उत्पत्तीस्थळे निष्कासित करून तेथे फवारणी करण्याचे आदेश देण्यात आले. त्या भागातील मोकळ्या भूखंडावर साचलेल्या पाण्याचा निचरा करून तो परिसर डासमुक्त करण्याची आरोग्य कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली. पार्वतीनगरसह आजूबाजूचा परिसर डेंग्यू डासमुक्त करून त्या भागातील डेंग्यू नियंत्रणाची जबाबदारी देवेंद्र गुल्हाणेंकडे, तर अन्य भागाची जबाबदारी त्या-त्या शहरी आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाºयांकडे देण्यात आली आहे. आरोग्य आणि स्वच्छता विभाग संयुक्तपणे ही मोहीम राबविणार आहे. महापालिकेच्या १३ शहरी आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात वैद्यकीय अधिकाºयांच्या नेतृत्वात प्रत्येकी ४ ते ५ पथक गृहभेटी करणार आहेत. त्यात एक एएनएम, २ लिंकवर्कर (आशा) व एका स्वच्छता कामगाराचा समावेश आहे. स्वच्छता कामगराजवळ लिंडेन व ब्लिचिंग राहणार आहे. कंटेनर सर्वेक्षणाचे आदेशही आयुक्तांनी दिलेत. याशिवाय डेंग्यूच्या जनजागृतीसाठी माराठी, हिंदी व उर्दू भाषेतील हस्तपत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत. कुलर काढण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, प्रभागात बॅनर लावले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
‘सेल्फी’चे निर्देश
डेंग्यूला अटकाव घालण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश देत असतानाच संबंधित अधिकाऱ्यांनी स्वत: डेंग्यू नियंत्रण मोहिमेत सहभागी व्हावे, डासांची उत्पत्तीस्थळे निष्कासित करावी, संबंधित भागात फवारणी करुन डेंग्यूला अटकाव घालावा, ही मोहीम राबविताना त्या वैद्यकीय अधिकाऱ्याने कर्मचाºयांसोबत ‘सेल्फी ’ पाठवावेत, असे निर्देश प्रशासनप्रमुखांनी दिले आहेत.

Web Title: Dengue: RAN compositions rebuff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.