डेंग्यू : रवि राणा उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 01:04 AM2018-08-19T01:04:00+5:302018-08-19T01:04:38+5:30
शहरात सर्वदूर झालेली डेंग्यूची लागण लक्षात घेता आ. रवि राणा शनिवारी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले. गरीब जनतेला उपचारासाठी येत असलेला महागडा खर्च पाहता त्यांनी महापालिका यंत्रणेला कामी लावले. यावेळी आ. राणा यांनी काही भागात स्वत: फवारणीसुद्धा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात सर्वदूर झालेली डेंग्यूची लागण लक्षात घेता आ. रवि राणा शनिवारी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले. गरीब जनतेला उपचारासाठी येत असलेला महागडा खर्च पाहता त्यांनी महापालिका यंत्रणेला कामी लावले. यावेळी आ. राणा यांनी काही भागात स्वत: फवारणीसुद्धा केली. त्यांच्यासमवेत प्रबुद्ध मंडळ, भीमज्योत संघटना, साई मित्र मंडळ साईनगर, संघर्ष युवा मंडळ म्हाडा व युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. या परिसरात ६० कामगारांचे एक पथक कामी लावले. त्यांच्याकडे १७ फॉगिंग मशिन देण्यात आल्या.
फ्रेजरपुरा, महादेवखोरी, संजय गांधीनगर, वडरपुरा, जेवडनगर, चवरेनगर, साईनगर, बडनेरा जुनीवस्ती व नवीवस्ती परिसरातील गल्ली-बोळात फिरून आ. राणा यांनी प्रत्यक्ष फवारणी करवून घेतली. या परिसरातील नाल्यांत साचलेला गाळ, कचऱ्याचे ढिगारे व अन्य अव्यवस्था पाहता मनपा अधिकाऱ्यांना नालीत उतरवून वस्तुस्थितीची जाणीव करून दिली व स्वच्छतेबाबत सातत्य ठेवण्याचे निर्देश दिले. डेंग्यूच्या उपचाराकरिता ५० रुपये खर्च येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमिवर आ. राणा यांनी तत्क्षण दखल घेत वस्तुस्थिती यंत्रणेच्या लक्षात आणून दिली. यावेळी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी सीमा नैताम, स्वास्थ्य अधीक्षक अरुण तिजारे, युवा स्वाभिमानचे शहर अध्यक्ष संजय हिंगासपुरे, सचिन भेंडे, नितीन बोरेकर, नीलेश भेंडे, संजीव गायकवाड, अर्शद अली, सुजित तायडे, नितीन तायडे, राजेश सुंडे, सविता लोखंडे आदी कर्मचारी उपस्थित होते.