डेंग्यू : उपचार, प्रतिबंधाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 01:26 AM2018-08-24T01:26:44+5:302018-08-24T01:27:10+5:30
महानगराला डेंग्यूच्या विळख्यातून सावरण्यासाठी आ. सुनील देशमुख यांच्या पुढाकाराने गुरुवारी महापालिकेत आढावा घेण्यात आला. डेंग्यू आजारावर उपचार, प्रतिबंध व उपाययोजनांवर आढावा घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महानगराला डेंग्यूच्या विळख्यातून सावरण्यासाठी आ. सुनील देशमुख यांच्या पुढाकाराने गुरुवारी महापालिकेत आढावा घेण्यात आला. डेंग्यू आजारावर उपचार, प्रतिबंध व उपाययोजनांवर आढावा घेण्यात आला. यावेळी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे कार्यवाहीची माहिती सादर करण्यात आली.
आ. सुनील देशमुख यांनी गृहभेटीद्वारे जनजागृती, संशयित डेंग्यूरुग्ण व उपचार झालेले रुग्ण आढळलेल्या भागात त्वरित फवारणी, धूरळणी करावी. डास अळी प्रतिबंधक औषध फवारणीच्या सूचना त्यांनी दिल्या. ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे आढळून आल्यास रुग्णांना नजीकच्या दवाखान्यात उपचार घेण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. प्रफुल कडू म्हणाले, या आजारात अॅस्प्रिन गोळी घेऊ नये, असे बजावले. कारण रुग्णाला रक्तस्राव झाल्यास स्थिती गंभीर होऊ शकते. प्लेटलेट्स ४० हजार असले तरी घाबरण्याचे कारण नाही.डॉ. अजय डफळे यांनी पॅरेसिटेमॉल व नॉर्मल सलाइन घेण्याचा सल्ला दिला. पीडीएमसीचे डीन पद्माकर सोमवंशी यांनी डेंग्यूचे निदान करणारी टेस्ट ६०० रुपयांमध्ये रुग्णालयात उपलब्ध असल्याचे सांगितले. डेंग्यू जनजागृतीसंदर्भात कार्यशाळा घेण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.
बैठकीला महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, आयुक्त संजय निपाणे, पक्षनेता सुनील काळे, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, गटनेता चेतन पवार, नगरसेवक मिलिंद चिमोटे, विलास इंगोले, प्रकाश बनसोड, अजय सारसकर, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम आदी उपस्थित होते.