एकाच रुग्णालयात डेंग्यूचे नऊ 'पॉझिटिव्ह'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 09:51 PM2017-10-05T21:51:21+5:302017-10-05T21:51:41+5:30
जिल्ह्यात जीवघेण्या डेंग्यू आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. राजापेठस्थित एका खासगी रुग्णालयात पाच दिवसांत डेंग्यू आजाराचे नऊ रूग्ण 'पॉझिटिव्ह' आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात जीवघेण्या डेंग्यू आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. राजापेठस्थित एका खासगी रुग्णालयात पाच दिवसांत डेंग्यू आजाराचे नऊ रूग्ण 'पॉझिटिव्ह' आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या गंभीर बाबीकडे आरोग्य प्रशासनाचे अद्यापही दुर्लक्ष आहे.
राजापेठ परिसरात एका रुग्णालयात १ ते ५ आॅक्टोबरदरम्यान डेग्यू आजाराचे ९ रूग्ण उपचारासाठी दाखल झाले आहे. या सर्व रुग्णांना डेंग्यू आजाराची लक्षणे निदर्शनास येताच त्यांची एनएस १ (अॅन्टीजन टेस्ट) तपासणी करण्यात आली. या रुग्णांना डेंग्यू असल्याबाबतचा पॉझिटिव्ह 'रिपोर्ट' खासगी पॅथॉलॉजीमधून प्राप्त झाल्याचे डॉ.मनोज निचत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गत महिन्यात जिल्ह्याभरात अनेक रूग्ण डेंग्यूचे पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र आरोग्य प्रशासन योग्यरीत्या दखल घेत नसल्याने डेंग्यूच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत शहरात सहा तर ग्रामीण भागात दोन रूग्ण या वर्षात पॉझिटिव्ह आढळल्याची नोंद हिवताप अधिकारी कार्यालयाकडे होती.
कोरडा दिवस पाळा
आता या रूग्णांमध्ये वाढ झाली असून योग्यवेळी दखल घेण्याची गरज आहे. नागरिकांमध्ये डेंग्यू हा आजार कसा होतो. किंबहुना झाला तर काळजी कशी घ्यायची यासंदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे. डेग्यूचे पॉझिटिव्ह रूग्ण हे शहरातील गोपाल नगर, जलारामनगर, गोंडबाबा मंदिर परिसर, अंबाविहार, गणेश कॉलनी, शिवाजी नगर तसेच अंजनगाव बारी, दर्यापूर परिसरातील असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या डेंग्यू 'पॉझिटिव्ह' बाबतची माहिती महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना कळविण्यात आली आहे.
प्रशासनाने शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच आरोग्य विभागाचेही दुर्लक्ष होत असल्याने अनेक डेंग्यूचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
डेंग्यू आजाराची लक्षणे
तीव्र ताप येणे, सतत डोके दुखणे, हातपाय दुखणे, थकवा येणे, त्याचप्रमाणे उलट्या होणे, रक्तातील पांढºया पेशी कमी होणे आदी लक्षणे डेंग्यू या आजारामध्ये रूग्णाला होतात.
या ठिकाणी डासांची उत्पत्ती
नारळाच्या करवंट्या, टायर व इतर ठिकाणी साचलेले पाणी वाहते करावे, डेंग्यूच्या डासांची स्वच्छ पाण्यात अंडी देत असल्याने घरातील पाणी जास्त दिवस एकाच ठिकाणी साठवून ठेवू नये, आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळणे गरजेचे आहे.