सोमवारपासून शिक्षक आघाडीचे विभागीय अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2016 12:10 AM2016-04-17T00:10:37+5:302016-04-17T00:10:37+5:30
शिक्षक आघाडीचे प्रथम विभागीय अधिवेशन १८ व १९ एप्रिल रोजी येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आले आहे.
अमरावती : शिक्षक आघाडीचे प्रथम विभागीय अधिवेशन १८ व १९ एप्रिल रोजी येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात राज्यातील मान्यवर शिक्षणतज्ज्ञ विविध विषयांवर आपली भूमिका मांडतील. शिक्षक आघाडीचे संस्थापक तथा आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या पुढाकाराने हे अधिवेशन होणार आहे.
१८ एप्रिलला सकाळी वैद्यकीय तपासणी शिबीर होईल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता विभागीय अधिवेशनाच्या उद्घाटनादरम्यान गोविंद ऊर्फ अण्णासाहेब देशपांडे यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा होणार आहे.
राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांची उपस्थिती राहणार आहे. याशिवाय १८ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजता 'मातृभाषेच्या शाळा टिकविणे एक आवाहन' या विषयावर आ. दत्तात्रय सावंत, तर १९ एप्रिलला सकाळी १० वाजता 'बिंदूनामावली आरक्षण पद निश्चिती' या विषयावर अपाले यांचे, तर दुपारी १२ वाजता नामदेवराव जरद यांचे व्याख्यान होईल. दुपारी ३ वाजता आ. श्रीकांत देशपांडे 'जुनी पेन्शन योजना कायदा तरतूद उपाय व शीर्षक आघाडीची भूमिका' या विषयावर मार्गदर्शन करतील. याशिवाय अन्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विभागीय अध्यक्ष सैय्यद राजीक सैय्यद गफ्फार, विभागीय सरचिटणीस विलास राऊत यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)