विभागीय क्रीडा संकुलात युवकावर काठ्यांनी हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 10:37 PM2019-03-05T22:37:25+5:302019-03-05T22:40:38+5:30
विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर मंगळवारी भर दुपारी पाच ते सहा जणांनी एका तरुणावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केल्याने प्रचंड खळबळ उडाली. या मारहाणीनंतर २० वर्षीय तरुण जीव मुठीत घेऊन पळाला. घटनेच्या माहितीवरून गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी पाचारण केले. मात्र, या घटनेवरून विभागीय क्रीडा संकुलाच्या आतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर मंगळवारी भर दुपारी पाच ते सहा जणांनी एका तरुणावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केल्याने प्रचंड खळबळ उडाली. या मारहाणीनंतर २० वर्षीय तरुण जीव मुठीत घेऊन पळाला. घटनेच्या माहितीवरून गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी पाचारण केले. मात्र, या घटनेवरून विभागीय क्रीडा संकुलाच्या आतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
कला व वाणिज्य महाविद्यालयाचा २० वर्षीय विद्यार्थी मंगळवारी सायंकाळी विभागीय क्रीडा संकुलाच्या आवारात सरावासाठी आला. दरम्यान पाच ते सहा जणांनी त्या तरुणावर लाठ्या काठ्यांनी हल्ला चढविला. त्यामुळे सरावासाठी आलेल्या सर्वांचेच हल्लखोरांकडे लक्ष गेले. त्या विद्यार्थ्याची एक सहकारी मधस्थीसाठी गेल्यानंतर हल्लेखोर थोडे थांबले. यादरम्यान त्या विद्यार्थ्याने तेथून पळ काढला. या घटनेची माहिती अनिल भुईभार यांनी गाडगेनगर पोलिसांना दिली. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले. हे प्रकरण गाडगेनगर पोलिसांत पोहोचल्यानंतर दोन्ही पक्षाने आपसी समझोता केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, विभागीय क्रीडा संकुलाच्या परिसरात घडलेला हा गंभीर प्रकार अप्रिय घटनेला आमंत्रण देणारा ठरला आहे. विद्यार्थ्याने जीव मुठीत घेऊन पलायन केल्याने सुदैवान तो बचावल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.
पालकही भेदरले; सुरक्षेसंबंधी उपाययोजनांची मागणी
मुलांना व्यायामाची सवय लागावी, सोबत विरगुंळा म्हणून मुले खेळतील, या भावनेने अनेक पालक लहान मुलांना विभागीय क्रीडा संकुलावर आणतात. मात्र, हे वातावरण अचानक असुरक्षित झाल्याचे दिसते. स्टेडियमच्या आवारात घडलेल्या मंगळवारच्या घटनेमुळे पालकांमध्येही चांगलीच धडकी भरली आहे. जिल्हा स्टेडियम परिसरातील सुरक्षेची जबाबदारी विभागीय क्रीडा उपसंचालक यांच्या अधिकारक्षेत्रात आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुरक्षेसंबंधी उपाययोजना करायला हव्यात. क्रीडा संकुलाला दोन प्रवेशद्वार आहेत. एक खुले तर, एक बंद आहे. मात्र, बंद प्रवेशद्वारासमोरच टवाळखोरांचा अड्डा बनला आहे. याशिवाय तरुणांचे जोडपे निवांतपणे रात्री उशिरादेखील बोलत बसलेले आढळते. अशातून हे गुंड प्रवृत्तीचे तरुण जिल्हा स्टेडीयमच्या आत शिरून मुक्त संचार करतात. मात्र, जिल्हा स्टेडियमची प्रशासकीय यंत्रणा कोणतीही दखल घेत नसल्याची ओरड नागरिकांनी सुरू केली आहे.
अशा प्रकारावर आळा घालण्यासाठी शंभर रुपयांच्या पासेस सुरू केल्या होत्या, जेणेकरून क्रीडा संकुलत कोण आले, कोण गेले, हे कळले असते. मात्र, उपक्रम बंद होताच अशा घटना घडायला सुरुवात झाली.
- प्रतिभा देशमुख,
क्रीडा उपसंचालक.