रुक्मिणीमातेच्या पालखीचे अंबानगरीत स्वागत; पालकमंत्र्यांकडून पूजन, लोकसेवेसाठी रुग्णवाहिकांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2022 12:57 PM2022-06-07T12:57:19+5:302022-06-07T13:25:27+5:30

यावेळी भक्तिमय अभंगवाणी व टाळमृदंगाच्या साथीने आसमंत निनादून गेले होते.

Departure Of Rukmini Mata Palkhi Towards Pandharpur minister yashomati thakur welcomes palkhi in amravati with enthusiasm | रुक्मिणीमातेच्या पालखीचे अंबानगरीत स्वागत; पालकमंत्र्यांकडून पूजन, लोकसेवेसाठी रुग्णवाहिकांचे लोकार्पण

रुक्मिणीमातेच्या पालखीचे अंबानगरीत स्वागत; पालकमंत्र्यांकडून पूजन, लोकसेवेसाठी रुग्णवाहिकांचे लोकार्पण

Next

अमरावतीविदर्भातील ४२७ वर्षांची प्राचीन परंपरा असलेल्या श्री रुक्मिणीमातेच्या पालखीचे भव्य स्वागत येथील बियाणी चौकात करण्यात आले. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, राजराजेश्वर महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांनी पालखीपूजन व वारकऱ्यांचे स्वागत केले. श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थेच्या वतीने तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या पायदळ दिंडी पालखीच्या दर्शनासाठी शेकडो अमरावतीकर उपस्थित होते. पालखीच्या स्वागतानिमित्त बियाणी चौकात व्यासपीठ उभारण्यात येऊन श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेची मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. त्यासभोवती फुलांच्या माळा, रांगोळ्या, स्वागत फलकांनी संपूर्ण चौक सुशोभित करण्यात आला होता. सुमधुर अभंगवाणी सादर करणाऱ्या संगीत पथकासाठी स्वतंत्र व्यासपीठ उभारण्यात आले होते. अशा उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पालखी चौकात येताच वारकरी व भाविकांनी ‘रुक्मिणीवल्लभ कृष्ण हरी’चा एकच जयघोष केला. यावेळी भक्तिमय अभंगवाणी व टाळमृदंगाच्या साथीने आसमंत निनादून गेले होते. कोविड साथीमुळे दोन वर्षांच्या निर्बंध संपल्यानंतर मुक्त वातावरणात पालखीचे अंबानगरीत आगमन झाल्यामुळे वारकरी बांधवांमध्ये उत्साह संचारला होता. राजराजेश्वर माउली महाराज यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पालखीचे पूजन पालकमंत्री ॲड. ठाकूर यांच्या व विविध मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी श्री विठ्ठल, श्री रुक्मिणीमातेची आरती करण्यात आली. प्रत्येक भाविकाला पालखीचे व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी चौकाच्या मधोमध उभारलेल्या व्यासपीठावर पालखी थांबवून भाविकांना पूजन व दर्शनाची सोय करून देण्यात आली. बाजूला महिला भाविकांनी गोल रिंगण करून विठ्ठल-रुक्मिणीच्या नामघोषात फेर धरला. पालकमंत्री यशाेमती ठाकूर याही त्यात सहभागी झाल्या. काहींनी फुगड्याही खेळल्या. श्री पांडुरंग व श्री रुक्मिणीमातेचा जयघोष करत भक्तिरसात भाविक दंग झाले होते.

राज्यात यंदा सर्वत्र चांगला पाऊस होऊ दे. धनधान्य पिकू दे. बळीराजा समृद्ध होऊ दे. सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे, अशी प्रार्थना सर्वांनी विठुराय व रुक्माईचरणी यावेळी केली. या स्वागतसोहळ्याला अनेक पदाधिकारी, अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकार्पण झालेल्या तीन रुग्णवाहिकांपैकी एक रुग्णवाहिका पालखीसमवेत जाणार आहे. डॉक्टरसमवेत सर्व उपचार सुविधा त्यात उपलब्ध असतील.

Web Title: Departure Of Rukmini Mata Palkhi Towards Pandharpur minister yashomati thakur welcomes palkhi in amravati with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.