Video : ‘रुक्मिणीवल्लभ कृष्ण हरी’चा जयघोष; आमदार रवी राणांनी वारकऱ्यांसोबत घातली फुगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2022 01:28 PM2022-06-07T13:28:48+5:302022-06-07T16:26:45+5:30
वारकरी व भाविकांनी ‘रुक्मिणीवल्लभ कृष्ण हरी’चा एकच जयघोष केला. यावेळी भक्तिमय अभंगवाणी व टाळमृदंगाच्या साथीने आसमंत निनादून गेले होते.
अमरावती : विदर्भातील ४२७ वर्षांची परंपरा असलेल्या श्री रुक्मिणीमातेच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. तत्पूर्वी या पायदळ दिंडी पालखीचे सोमवारी सायंकाळी अमरावतीत आगमन झाले. यावेळी, शहरातील विविध ठिकाणी जल्लोषात पालखीचे स्वागत करण्यात आले. आमदार रवी राणा यांच्या हस्ते राजापेठ चौकात पालखीचे स्वागत करण्यात आले. राणांनी पूजन करून हनुमान चालीसा वाटप केली. यावेळी वारकऱ्यांनी फुगडीवर ताल धरला होता. आमदार राणांनाही फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.
विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कौंडण्यपूर येथील रुक्मिणीमातेची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. मागील ४२८ वर्षांपासून ही पालखी दरवर्षी पंढरपूरला जात असते. दरम्यान, सोमवारी अमरावती येथे दाखल झालेल्या दिंडीचे राजापेठ मुख्य चौकात आमदार रवी राणा व युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी माता रुक्मिणीच्या पालखीचे भव्य स्वागत करून आशीर्वाद घेतले. शेतकरी बांधवांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने हजेरी लावावी, अशी मनोकामना रवी राणा यांनी केली.
विदर्भातील ४२७ वर्षांची परंपरा असलेल्या श्री रुक्मिणीमातेच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान,आमदार राणांनाही फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. #RaviRanapic.twitter.com/50NFxIyG97
— Lokmat (@lokmat) June 7, 2022
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांकडून पूजन
शहरातील बियाणी चौकातही फटाक्यांची आतषबाजी तसेच टाळमृदुंगाच्या गजरात पालखीचे स्वागत व पूजन करण्यात आले. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, राजराजेश्वर महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांनी पालखीपूजन व वारकऱ्यांचे स्वागत केले. श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थेच्या वतीने तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. पालखीच्या स्वागतानिमित्त बियाणी चौकात व्यासपीठ उभारण्यात येऊन श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेची मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. त्यासभोवती फुलांच्या माळा, रांगोळ्या, स्वागत फलकांनी संपूर्ण चौक सुशोभित करण्यात आला होता. वारकरी व भाविकांनी ‘रुक्मिणीवल्लभ कृष्ण हरी’चा एकच जयघोष केला. यावेळी भक्तिमय अभंगवाणी व टाळमृदंगाच्या साथीने आसमंत निनादून गेले होते.
प्रत्येक भाविकाला पालखीचे व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी चौकाच्या मधोमध उभारलेल्या व्यासपीठावर पालखी थांबवून भाविकांना पूजन व दर्शनाची सोय करून देण्यात आली. कोविड साथीमुळे दोन वर्षांच्या निर्बंध संपल्यानंतर मुक्त वातावरणात पालखीचे अंबानगरीत आगमन झाल्यामुळे वारकरी बांधवांमध्ये उत्साह संचारला होता. श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या पायदळ दिंडी पालखीच्या दर्शनासाठी शेकडो अमरावतीकर उपस्थित होते.