आगार गजबजले, बसगाडीत गुंजले 'ताजा खबर'चे स्वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 05:00 AM2020-08-21T05:00:00+5:302020-08-21T05:01:30+5:30
लॉकडाऊनने लावलेले प्रतिबंध गुरुवारपासून दूर झाल्यामुळे आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बसफेºया सुरू झाल्यात. प्रवाशांमध्ये त्यमुळे आनंदाचे वातावरण आहे. गावी अडकून पडलेल्या नागरिकांची सोय झाली. चालक वाहकांमध्येही उत्साह आहे. एसटीला प्रवाशांनी प्रतिसाद दिला. फिजिकल डिस्टंसिंगबाबत आसनव्यवस्थेची काळजी एसटी प्रशासनाकडून घेण्यात आली.
सचिन मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दीर्घ कालावधीनंतर आगार आणि बसस्थानके पुन्हा गजबजल्याचे सुखद चित्र गुरुवारी अनुभवता आले. बसगाड्यांचे आवागमन, प्रवाशांची गजबज आणि वृत्तपत्र विक्रेत्यांची लगबग हे पूर्वीचे चित्र जिवंत झाले.
विघ्नहर्त्याच्या आगमनाची चाहूल लागली नि बसफेऱ्यांना प्रतिसाद देऊन कोरोनाच्या 'भयविघ्ना'वर जिल्हावासियांनी सशक्त मनाने जणू मातच केली.
लॉकडाऊनने लावलेले प्रतिबंध गुरुवारपासून दूर झाल्यामुळे आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बसफेऱ्या सुरू झाल्यात. प्रवाशांमध्ये त्यमुळे आनंदाचे वातावरण आहे. गावी अडकून पडलेल्या नागरिकांची सोय झाली. चालक वाहकांमध्येही उत्साह आहे. एसटीला प्रवाशांनी प्रतिसाद दिला. फिजिकल डिस्टंसिंगबाबत आसनव्यवस्थेची काळजी एसटी प्रशासनाकडून घेण्यात आली. पहिल्याच दिवशी दोन लक्ष रुपयांच्या घरात उत्पन्न झाल्याची माहिती विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली.
बसमध्ये वृत्तपत्र; प्रवासी आनंदी
‘आज की ताजा खबर’ हा परिचित स्वर एसटी बसमध्ये गुरुवारी पुन्हा एकदा गुंजल्याने प्रवाश्यांमधील वाचक सुखावला. अनेक दिवसांपासून प्रवाशांना बसमध्ये वृत्तपत्रे वाचण्याचा आनंद घेता आला नाही. बसगाड्यांमध्ये, बसस्थानकांवर हॉकर्सना वृत्तपत्रे विकताना बघून अनेकांनी ती खरेदी केलीत. पहिल्याच दिवशी वाचकांकडून मिळणाºया प्रतिसादामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरही आनंद झळकला.
गुरुवारी एसटी बसमध्ये वृत्तपत्र विक्रीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. बसमध्ये प्रवासीही भरपूर होते. प्रवाशांनी वृत्तपत्र विकत घेतल्याने मला आनंद झाला. वृत्तपत्र मिळल्याने प्रवाशीही आनंदी होते.
- मनोज सोलंकी,
वृत्तपत्र विक्रेता, दर्यापूर
पाच महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर एसटीने मूर्तिजापूरला प्रवास केला. सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने दोन शहरांमधील व्यवहारही खोळंबले होते. एसटी वाहतूक सुरू झाल्याचा मनस्वी आनंद आहे.
- अक्षय टेहरे,
एसटी प्रवासी
प्रवाशांसाठी गुरुवारचा दिवस आनंदाचा ठरला. यापूर्वी १५ दिवसांतून एकच दिवस आम्हाला बस सेवा देता येत होती. आता ते बंधन दूर झाले. बसमध्ये प्रवासी पाहून आम्हाला आनंद झाला.
- नंदकिशोर मुकिंद,
बसचालक
बसमध्ये प्रवाशांकडून आज चांगला प्रतिसाद मिळाल्याने आम्हाला दिलासा मिळाला. चार महिन्यांत १५ दिवसांतून एकदाच कामावर यावे लागत होते. आता बससेवा सुरळीत झाल्याने आम्ही आनंदी आहोत.
- नरेंद्रसगणे,
बसवाहक