अमरावतीत डेप्युटी बँक मॅनेजरची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 06:15 PM2021-05-10T18:15:44+5:302021-05-10T18:17:09+5:30
Amravati news गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बियाणी चौकात राहणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी बँक मॅनेजरने गळफास घेऊन आत्महत्या केली. अनमोल बाबूराव शहाणे (३७, रा. बियाणी चौक) असे मृताचे नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बियाणी चौकात राहणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी बँक मॅनेजरने गळफास घेऊन आत्महत्या केली. अनमोल बाबूराव शहाणे (३७, रा. बियाणी चौक) असे मृताचे नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पोलीस सूत्रांनुसार, अनमोल शहाणे हे बियाणी चौक येथील स्टेट बँक ऑफ इंडियात डेप्युटी मॅनेजर पदावर कार्यरत होते. ते याच परिसरात प्रकाश देशमुख यांच्या घरी काही महिन्यांपासून कुटुंबासमवेत भाड्याने राहत होते. मद्याचे व्यसन जडल्याने ते नेहमी त्याच्या अमलात राहत होते. शनिवारी सकाळपासून अनमोल यांनी मद्यपानास सुरुवात केली. जेवण न केल्याने पत्नीशी किरकोळ वाद झाला. यानंतर ते बेडरूममध्ये गेले. रात्री ८.३० वाजता पत्नीला बेडरूमचे दार आतून बंद आढळले. त्यांनी दार ठोठावले तरी अनमोल यांनी दार उघडले नाही. त्यामुळे पत्नीने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.
गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून बेडरूमचे दार तोडले असता, अनमोल हे पाळण्याच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवून घटनास्थळाचा पंचनामा केला. चार वर्षांपूर्वी लोणार येथे कार्यरत असताना अनमोल यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पत्नीने गाडगेनगर पोलिसांना दिली. पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले करीत आहेत.