आग्र्याच्या तरूणाकडून देशी कट्टा जप्त; ११ जिवंत काडतुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2023 09:38 PM2023-04-06T21:38:04+5:302023-04-06T21:39:07+5:30
Amravati News नांदगाव पेठ पोलिसांनी उत्तरप्रदेशातील आग्रा येथील रहिवासी असलेल्या आरोपीकडून देशी कट्टा व ११ जिवंत काडतूस जप्त केले.
प्रदीप भाकरे
अमरावती: नांदगाव पेठ पोलिसांनी उत्तरप्रदेशातील आग्रा येथील रहिवासी असलेल्या आरोपीकडून देशी कट्टा व ११ जिवंत काडतूस जप्त केले. शिवपार्वतीनगर परिसरात ६ एप्रिल रोजी दुपारी ४.४५ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. श्रीपती भजनलाल (४०, रा. टिनका नगला, धारूपुरा, आग्रा उत्तरप्रदेश) असे अटक आरोपीचे नाव आहे.
नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवपार्वतीनगर भागात एक इसम संशयास्पद स्थितीत फिरत असून त्याच्याकडे देशी कट्टा असल्याची माहिती ठाणेदार प्रवीण काळे यांना मिळाली. ती माहिती डीसीपी व एसीपींना देत काळे यांनी त्या भागात ट्रॅप लावला. त्यावेळी एक इसम संशयितरित्या फिरतांना मिळून आला. संशयावरून त्याच्या ताब्यातील काळया रंगाच्या बॅगेची पाहणी केली असता त्यात एक देशी कटटा व ११ जिवंत काडतूस असा १२ हजार २०० रुपयांचा ऐवज दिसून आला. तो देशी कट्टा व काडतुसे विनापरवाना मिळून आल्याने पंचनामा करून जप्त करण्यात आले. आरोपीला अटक करून नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस आयुक्त नविनचंद्र रेडडी, पोलिस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रविण काळे, पोलीस निरिक्षक हणमंत डोपेवाड, हवालदार संजय खारोडे, संजय नेहारे, वैभव यांनी ही कारवाई केली.