‘देशी’ला मिळणार संत्रा, मौसंबी, निंबूचा स्वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:34 PM2018-04-17T23:34:24+5:302018-04-17T23:34:24+5:30
अवैध दारू विक्री रोखण्यासाठी आता देशी दारूचा रंग बदलविण्याची तयारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने चालविली आहे. यापुढे ‘देशी’ संत्रा, मौसंबी, निंबू, कलिंगड आदी फळांच्या आस्वादात निर्मिती केली जाणार असून, मद्य निर्मात्यांनी त्याअनुषंगाने अबकारी खात्याकडे प्रस्ताव सादर केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अवैध दारू विक्री रोखण्यासाठी आता देशी दारूचा रंग बदलविण्याची तयारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने चालविली आहे. यापुढे ‘देशी’ संत्रा, मौसंबी, निंबू, कलिंगड आदी फळांच्या आस्वादात निर्मिती केली जाणार असून, मद्य निर्मात्यांनी त्याअनुषंगाने अबकारी खात्याकडे प्रस्ताव सादर केला आहे.
शासन तिजोरीत महसूल विभागानंतर अबकारी विभाग उत्पन्न जमा करणारा विभाग, अशी नोंद आहे. हजारो कोटींची रक्कम मद्य निर्मिती, विक्री, हॉटेल, परमीट, बार रूम परवाना शुल्कातून अबकारी विभाग शासनाकडे जमा करते. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाला अवैध दारू विक्री, उत्पादन रोखणे मोठे ‘चॅलेंजिंग’ आहे. राज्याचे अबकारी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी दी डिस्टिलर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्र या संघटनेने देशी दारू विविध स्वादमध्ये निर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. देशी दारू अन्य दारुच्या तुलनेत स्वस्त असल्याने मद्यपींची ‘देशी’ला अधिक मागणी आहे. तसेही अबकारी खात्याच्या नोंदी देशी दारू विक्रीचा सर्वाधिक खप आहे. यापुढे देशी दारू बंद बाटलीतच दिली जाणार आहे. देशी दारू सध्या पांढऱ्या रंगात मिळत असून, मद्यविक्रेते संघटनांनी यात बदल करण्याची मागणी केली आहे. देशी दारू संत्रा, मौसंबी, निंबू, कलिंगड आदी फळांचे स्वाद असलेल्या स्वरूपात निर्मिती केल्यास तिला मागणी वाढेल, असे मद्यनिर्मात्यांचे म्हणणे आहे. देशी विविध स्वादमध्ये मिळाल्यास अवैध दारूविक्री रोखणे सुकर होईल, असा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. सार्वजनिक जागेत मद्य प्राशन करण्यावरही नियंत्रण येणार आहे. सीएल-३ ही देशी दारू दुकानातून खुल्या विक्रीस उपलब्ध व्हायची; त्यामुळे खुले जागेवर सेवनाचे प्रकार वाढले. मात्र आता पॅकबंद देशी दारू उपलब्ध होणार आहे. सीएल -३ व एफएल- २ ही दुकाने सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याचा प्रस्ताव असून, यावर लवकरच तोडगा निघेल.
अवैध दारू विक्री रोखण्यासाठी ग्रामरक्षक दल
गावातील अवैध दारू विक्री, वाहतूक रोखण्यासाठी सरपंचाकडे महत्त्वाची जबाबदारी आहे. त्याकरिता सरपंचांना ग्रामरक्षक दलाची मदत घेता येणार आहे. गावात दारूबंदीचे पाऊल उचलायचे असल्यास ग्रामरक्षक दलाची स्थापना करणे आवश्यक आहे. पोलीस, महसूल विभागाचे सहकार्य अपेक्षित आहे. गाव, खेड्यांत ग्रामरक्षक दल दारूबंदीचा उठाव करतील, असे शासनाचे नवे धोरण आहे.
देशी दारू विविध फळांच्या स्वादमध्ये निर्मित करण्याचा प्रस्ताव शासनस्तावर आहे. मद्य निर्मात्यांची तशी मागणी असून, याबाबत शासनाने निर्णय घेतल्यानंतर कार्यवाही होईल.
- प्रमोद सोनोने,
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अमरावती