पक्ष्यांसाठी तयार केली १७ किलोमीटर ‘पाणेरी’
By admin | Published: May 13, 2017 12:10 AM2017-05-13T00:10:13+5:302017-05-13T00:10:13+5:30
वैशाख वणव्यात तहानेने तडफडून मरणाऱ्या पक्ष्यांना दिलासा मिळावा, म्हणून या ना त्या उपाययोजना केल्या जातात.
चांदूर-पुसदा मार्ग : शहरातील पक्षीप्रेमींचा स्तुत्य उपक्रम
चांदूरबाजार : वैशाख वणव्यात तहानेने तडफडून मरणाऱ्या पक्ष्यांना दिलासा मिळावा, म्हणून या ना त्या उपाययोजना केल्या जातात. मनुष्य प्राण्यांसाठी पाणपोया लावल्या जातात. पण, मूक पक्ष्यांचा विचार करून त्यांच्या तृष्णातृप्तीसाठी एक-दोन नव्हे, तर १७ किलोमीटरपर्यंत पाणेरी लावून शहरातील पक्षिप्रेमींनी आगळ्या भूतदयेचा परिचय दिला.
चांदूरबाजार ते पुसदा मार्गावरून एक फेरफटका मारला असता या रस्त्यावरच्या प्रत्येक झाडावर मातीच्या गंगोली आणि त्यात थंडगार पाणी दिसून येते. पक्षी पाण्याच्या शोधार्थ येतात आणि या गंगोल्यांमधील पाणी पिऊन तृप्त होतात. शहरातील काही पशुप्रेमींनी हा उपक्रम अविरत प्रयत्नांमधून राबविला आहे. निसर्गाचे संतुलन कायम राखण्यामध्ये पशू-पक्ष्यांचा मोठा वाटा आहे. परंतु दूषित वातावरण, झाडांची कमी होत चाललेली संख्या आदी कारणांनी पक्ष्यांची संख्या घटत चालली आहे. पक्ष्यांना जगविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्याबद्दल सातत्याने जागृतीदेखील केली जात आहे.
१७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यात प्रत्येक हिरव्या झाडांवर दोरीने गंगोली टांगल्या आहेत. यात नियमित पाणी भरले जाते. अशा एकूण ७५ गंगोल्या टांगलेल्या आहेत. यात दररोज ताजे पाणी भरण्याची जबाबदारी सुद्धा पक्षीमित्रांनी स्वयंस्फुर्तीने उचलली आहे. वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोत आटत असताना पाण्याच्या थेंबाथेंबाकरिता पक्षी मोताद होत आहेत. कित्येक मृत्युमुखी देखील पडत आहेत. या पार्श्वभूमिवर हा उपक्रम इतरांसाठीदेखील प्रेरणादायी ठरणाराच आहे. या नाविण्यपूर्ण उपक्रमात राजीव शिंदे, नीलेश माहुरे, राजेश ढवळे, विजय कुऱ्हेकर, अतुल मुळे, संजय राऊत, नीलेश अंबाडेकर, संजय मुळे आदींचा सहभाग लाभत आहे.
नागरिकांनी पुढे येण्याची गरज
पक्षीप्रेमींनी पुढाकार घेऊन तब्बल १७ किलोमीटर लांब पाणेरी सुरू केली आहे. पक्ष्यांना यातून जीवदान मिळत आहे. परंतु कित्येक ठिकाणी अद्यापही पक्ष्यांसाठी पाण्याची सोय नाही. यामुळे सर्वच नागरिकांनी याकामी पुढाकार घेऊन शक्य होईल तेथे पक्ष्यांसाठी आपल्या परीने पाण्याची सोय करणे गरजेचे आहे.