पीजी'च्या परीक्षार्थींना 'नेट'च्या परीक्षेत बसायला 'केजी'च्या विद्यार्थांचा डेस्क
By उज्वल भालेकर | Published: June 18, 2024 09:25 PM2024-06-18T21:25:17+5:302024-06-18T21:25:25+5:30
के.के. कॅमब्रीज परीक्षा केंद्रावरील प्रताप, परीक्षार्थींमध्ये संताप
अमरावती: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता चाचणी युजीसी नेट- २०२४ परीक्षा १८ जूनला पार पडली. परंतु शहराबाहेर असलेल्या के के कॅमब्रीज परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थींचे मात्र बसण्याचे चांगलेच हाल झाले. या केंद्रावर बसण्यासाठी 'केजी'च्या विद्यार्थ्यांचे डेस्क परीक्षार्थींना देण्यात आले होते. त्यामुळे तीन तास या छोट्याशा डेस्कवर बसून पेपर देतांना विद्यार्थांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
ज्युनिअर रिसर्च फेलाेशिप तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयांत सहायक प्राध्यापक पदावर नियुक्तीसाठी नेट परीक्षा उत्तीर्ण हाेणे गरजेचे आहे. तसेच युजीसीने जून २०२४ पासून विविध ८३ विषयांमध्ये पीएच.डी ला प्रवेश घेण्यासाठी नेट परीक्षा अनिवार्य केली आहे. त्यामुळे दरवर्षी देशभरातील लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत ही परीक्षा घेतली जाते. मागीलवर्षी ऑनलाइन परीक्षेदरम्यान आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे दोन तास परीक्षा उशिरा सुरू झाली होती. यावर्षी अशाप्रकारचा गोंधळ होऊ नये म्हणून १८ जूनला 'नेट'ची परीक्षा ऑफलाईन घेण्यात आली. दोन शिफ़्टमध्ये या परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते.
यावेळी शेकडो विद्यार्थांना शहराबाहेर असलेले के के कॅमब्रीज हे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. यावेळी या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना बसण्यासाठी येथे शिकणाऱ्या 'केजी'च्या विद्यार्थांच्या डेस्कची व्यवस्था केली होती. यावेळी परीक्षार्थींना या छोट्याशा डेस्कवर बसून पेपर कसा सोडवणार असा प्रश्न उपस्थिती करत डेस्क बदलून देण्याची मागणी केली. परंतु डेस्क बदलून मिळणार नाही, तुम्ही या संदर्भात 'एनटीए'ला ऑनलाइन तक्रार नोंदवा असा सल्ला परीक्षा खोलीवर असलेल्या परिवेक्षक यांनी दिला. त्यामुळे तीन तासाच्या या परीक्षा कालावधीत छोट्याशा डेस्कवर बसताना होणारा त्रास सहन करत विद्यार्थांना परीक्षा द्यावी लागली. एनटीए परीक्षा केंद्र निवडताना संबंधित केंद्रावर बसण्याची व्यवस्था तसेच इतरही सुविधा तपासत नाही का असा प्रश्न आता परीक्षार्थी उपस्थित करत आहेत.