पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही गुटखाबंदी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 06:00 AM2020-01-31T06:00:00+5:302020-01-31T06:00:56+5:30
पालकमंत्री ठाकूर यांनी जिल्ह्याचा आढावा घेताना अवैध दारू आणि गुटखा विक्रीच्या मुद्द्यावरून प्रशासनाला निरूत्तर केले होते. विशेषत: अन्न व औषध प्रशासन विभाग गुटखा तस्करी रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ना. ठाकूर यांनी ठेवला होता. मनुष्यबळ नसल्याच्या नेहमीच्या रडगाण्यावर पालकमंत्री संतापल्या. कारणे नकोत, जिल्ह्यातून गुटखा हद्दपार झालाच पाहिजे, अशी तंबी त्यांनी एफडीएला दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी गत आठवड्यात जिल्ह्यातून गुटखा हद्दपार करा, असे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. मात्र, तेव्हापासून यात काहीही सुधारणा झालेली नाही, उलट ‘पैसे द्या अन् माल घ्या’ असे गुटखा विक्रीचे वास्तव जिल्हाभरात आहे.
पालकमंत्री ठाकूर यांनी जिल्ह्याचा आढावा घेताना अवैध दारू आणि गुटखा विक्रीच्या मुद्द्यावरून प्रशासनाला निरूत्तर केले होते. विशेषत: अन्न व औषध प्रशासन विभाग गुटखा तस्करी रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ना. ठाकूर यांनी ठेवला होता. मनुष्यबळ नसल्याच्या नेहमीच्या रडगाण्यावर पालकमंत्री संतापल्या. कारणे नकोत, जिल्ह्यातून गुटखा हद्दपार झालाच पाहिजे, अशी तंबी त्यांनी एफडीएला दिली. मात्र, त्यानंतरच्या १० दिवसांत गुटखा विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन वा पोलिसांनी नियोजनच केले नाही, हे वास्तव दोन्ही विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’कडे दिलेल्या वक्तव्यात आढळले आहे. गुटखा विक्री रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन असो वा पोलीस यंत्रणा किती सजग आहे, हेही यातून दिसून येते. गुटखा विक्री आणि तस्करी रोखण्याचे पालकमंत्र्यांच्या आदेशाचे काटेकारेपणे पालन केले जात नाही. त्यामुळे गुटखा तस्करीत प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हात असल्याच्या चर्चा खºया का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे.
शहरात कोणत्याही ठिकाणी गुटखा उपलब्ध आहे. राज्यात गुटखाबंदी असताना तो कोठून, कसा येतो, याचे सगळे मार्ग पोलीस, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाºयांना माहिती आहे. मात्र, ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ यातून हा व्यवसाय फोफावला आहे. गुटखा विक्री बंद करावी, यासाठी इंडियन मुस्लिम एकता मंचचे अब्दुल रफिक यांनी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालकांकडे तक्रार दिली आहे.
मध्य प्रदेशातील सावर्डीतून येतो ‘बाजीराव’
हल्ली बाजीराव या गुटख्याची धूम आहे. अल्पवयीनही हा गुटखा बाळगतात. या गुटख्याचा मालक बडनेºयातील रहिवासी गुटखा माफिया आहे. विदर्भात गुटखा व्यवसायाचे जाळे सर्वदूर पोहचविण्यासाठी या माफियाला पोलिसांचे बळ मिळत असल्याची माहिती आहे.
बडनेरा, बेलोरा गोदामात गुटखा साठवण
बडनेरा येथील सिंधी कॅम्प आणि अकोला मार्गालगतच्या बेलोरा येथील गोदामात कोट्यवधीच्या गुटख्याची साठवण केली जात असल्याची माहिती आहे. अवैध गुटखा व्यवसायाला ग्रामीण, शहर पोलिसांचे अभय आहे. पोलीस विभागातील बड्या अधिकाºयांचे गुटखा माफियांसोबत ‘मधुर’ संबंध आहेत. विदर्भात विविध ब्रँडच्या नावे विकल्या जाणाºया गुटख्याच्या तस्करीचे केंद्र हे बडनेरा व इतवारा बाजार आहे. जिल्हाभरात गुटखा विक्रीसाठी जाळे पसरले आहे. गावखेड्यात गुटखा पोहचविण्यासाठी १५ ते २० चारचाकी वाहने वापरली जातात.
बनावट ‘हॉट’ची निर्मिती
केरळ येथे उत्पादित होणारा ‘हॉट’ नामक गुटखा हा अमरावती शहरात बनावट विकला जात आहे. या ‘हॉट’ गुटख्याची निर्मितीसुद्धा बडनेऱ्यातील माफियाकडून करण्यात येत आहे. नजर, विमल, पन्नी नजर, सात-सात, तलब, ९ हजार आदी गुटखा ब्रॅन्ड मध्यप्रदेश आणि अमरावती जिल्ह्यातच तयार केले जातात.
नागझिरी, पांढरी येथे कारखाना
अकोला मार्गालगतच्या नागझिरी व भातकुली ते बडनेरा मार्गावरील पांढरी येथील एका शेतात गुटखा निर्मितीचा कारखाना आहे. या दोन्ही ठिकाणावरुन तयार होणारा ‘९ हजार’ गुटखा हा संपूर्ण विदर्भात पोहचविला जात असल्याची माहिती आहे. बडनेरा येथे गुटखा माफियाचे वास्तव असून, गुटखा व्यवसायाची उलाढाल दररोज दोन ते तीन कोटींची आहे.
लालखडी, इतवारा बाजारातून विक्र ी
अमरावती शहरात सुमारे दोन हजार लहान-मोठ्या व्यावसायिकांकडून गुटखा विक्री होते. त्यांना स्थानिक लालखडी येथील इमरान आणि इतवारा बाजारातील जब्बार नामक ठोक व्यापारी गुटखा पुरवित असल्याचे सूत्रांनी सांगितले. रेल्वे स्थानक चौकातील एका व्यावसायिकाकडे खुलेआम ठोक गुटखा विकल्या जातो, तर जिल्ह्यात गुटखा विक्रीत जावेदचा बोलबाला आहे.
पालमंत्र्यांनी जिल्ह्यातील गुटखा विक्री बंद करण्याबाबत अन्न व औषध प्रशासनाला आदेश दिले आहेत. मात्र, त्यांच्याकडे मनुष्यबळाचा अभाव आहे. या विभागाला योग्य ते मनुष्यबळ उपलब्ध करण्याचे आदेश पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत.
- संजयकुमार बाविस्कर
पोलीस आयुक्त
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या आदेशानुसार अंमलबजावणीसाठी विशेष पथक गठित करण्यात येणार आहे. विभागातील अन्न व औषध निरीक्षकांची चमू तयार करून गुटखा विक्री रोखण्यासाठी नियोजन सुरू आहे. तोकडा कर्मचारी वर्ग हा सर्वात मोठा अडसर ठरत आहे.
- सुरेश अन्नपुरे
सहआयुक्त, एफडीए