निराधार बहिणी वाघाच्या जबड्यात राहून करतात शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:13 AM2021-03-08T04:13:21+5:302021-03-08T04:13:21+5:30
फोटो पी ०७ पुसला फोल्डर पुसल्याच्या उच्चशिक्षित कृषिकन्या : बिडकर भगिनींची उंच भरारी, वर्षाकाठी चार ते पाच ...
फोटो पी ०७ पुसला फोल्डर
पुसल्याच्या उच्चशिक्षित कृषिकन्या : बिडकर भगिनींची उंच भरारी, वर्षाकाठी चार ते पाच लाखांचे उत्पादन
संजय खासबागे/गजानन नानोटकर
वरुड/पुसला : ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे’ ही उक्ती साकारत पुसला येथील बिडकर भगिनींनी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या शेती व्यवसायात स्वत:ला झोकून देत आर्थिक समृद्धी मिळविली आहे. पडीक शेतीत राबून त्यांच्या घामाचे मोती झाले आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त वाघाच्या जबड्यात राहून समृद्ध शेती कसणाऱ्या बिडकर भगिनींची कहाणी महिलांसाठी प्रेरणादायी आहे.
पुसला येथील सुचिता आणि बेबी बिडकर यांच्या संघर्षमय जीवनाची ही कहाणी आहे. अहोरात्र मेहनत करून शेतीतील उत्पादनातून आलेल्या रकमेने आई वडिलांच्या हयातीतच त्यांनी दोन मोठ्या बहिणींचे लग्न केले. अशातच २००९ मध्ये वडील, तर २०१२ मध्ये आईचा मृत्यू झाला. मातृपितृ छत्र हरविल्याने तीन बहीण निराधार झाल्या. मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करून सुचिता व बेबी यांनी आपल्या तिसऱ्या बहिणीचा विवाह केला. पदवीधर असलेल्या या बिडकर भगिनी रात्री-अपरात्री शेतावर राबून आपला उदरनिर्वाह करतात. त्या चार एकर शेतातून चार लाखांपेक्षाही अधिक वार्षिक उत्पन्न काढत आहेत. कुठलाही आधार नसताना पुरुषाला लाजवेल अशी शेती त्या करीत आहेत.
पुसला येथील सुचिता यांचे वडील दशरथ बिडकर यांच्याकडे चार एकर ४ गुंठे शेती. परंतु, व्यसनाधीन असल्याने शेती पडीक. राहते घर कुडाचे. आई शेतमजुरी करून पाच मुलींचा सांभाळ करीत होती. मुलगा नसल्याने सर्व जबाबदारी माधुरी, नलिनी, सुनंदा, सुशीला आणि बेबी या मुलींना पार पाडावी लागली. मुली मोठ्या झाल्या. शिक्षण घेत असतानाच शेती कसायची, ती पिकवायची, हा ध्यास होता. २००० साली त्यांनी शेतीच्या मशागतीला सुरुवात केली. ३०० संत्राझाडे लावली. शेतात बागायती पिके घेण्यास सुरुवात केली. यामध्ये एकाच वेळी गहू , कपाशी, तूर आणि भाजीपाला उत्पादन घेणे सुरू केले. वडिलांच्या हयातीत माधुरी आणि नलिनी यांचा विवाह पार पडला. २००९ ला वडिलांचा, तर आजारपणामुळे २०१२ ला आईचा मृत्यू झाला. शेतीव्यवसाय सुरूच ठेवून तिसरी बहीण सुनंदा हिचा २०१४ मध्ये विवाह पार पडला. यादरम्यान सुशीलाने इंग्रजी वाङ्मयात बी.ए. केले, तर बेबीने बारावीनंतर शिक्षण सोडले.
अतिदुर्गम भागात पूर्णवेळ शेती
बिडकर भगिनींची शेती अतिदुर्गम वन्य प्रदेशातील पांढरी शिवारात. व्यसनाधीन पित्याकडून मदतीची कसलीही अपेक्षा न ठेवता ती त्यांनी उत्पादनक्षम बनविली. वाघ, अस्वली, रानडुक्कर आदी हिंस्त्र प्राण्यांचा वावर असलेल्या या परिसरात रात्री-अपरात्री जाऊन ओलित केले. अनेक प्रसंगांना त्यांना तोंड द्यावे लागले. मात्र, न डगमगता या कृषिकन्यांनी शेती व्यवसाय सुरूच ठेवून गावात चांगले घर बांधले. परिस्थितीपुढे हात न टेकता, आदर्श उभा केला. शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीसुद्धा त्यांच्या कार्याची दखल घेऊन २२ जानेवारीला पुसला गाव गाठून भेट घेतली. बिडकर भगिनींचा गौरवदेखील केला.
---------------------
फोटो पी ०७ सिंधू
संकटावर मात करून केली कष्टाची शेती
कावली वसाड : कावली येथील सिंधू विनोद पाले या महिलेने शेतीलाच देव समजून त्याची श्रमरूपी आराधना केली. घामाची फुले वाहिली आणि त्यातील पिकाच्या भरवशावर पतीपश्चात एकल पालकाची भूमिका जबाबदारीने निभावली.
सिंधू व विनोद पाले यांचा १९९८ साली विवाह झाला. संसाराच्या वेलीवर त्यांना दोन मुली झाल्या. संसाराला आधार म्हणून मोठ्या कष्टाने सिंधू व विनोद शेती करू लागले. अशातच विनोद पाले यांचे निधन झाले. त्यामुळे संसाराची धुरा सिंधू यांच्यावर आली. मात्र, जराही न डगमगता आपल्या शेतीलाच देव मानून शेतीची मशागत केली. एकट्या सिंधू सात एकर शेतात हातात पावडे घेऊन शेती करू लागल्या.
सिंधू पाले यांनी आपल्या दोन्ही मुली शिक्षणक्षेत्रामध्ये प्रगत केल्या. मोठी मुलगी दामिनी ही आता एमबीए, तर दुसरी मुलगी बी.कॉम. करीत आहे. त्यांनी शेतामध्ये विहीर खोदली. आज मुबलक पाणी असून, शेतामध्ये गहू, हरभरा, तीळ, उन्हाळी मूग अशी पिके त्या घेतात. स्वत: निंदण, डवरणी व पावडे हातात घेऊन त्या ओलीत करतात. शेतात स्वत: कष्ट घेतल्यानेच उत्पादनाचा अव्वल दर्जा राखता आला असल्याचे असल्याची त्यांनी यावेळी सांगितले.
-----------