आग विझविण्यासाठी गेलेले अग्निशमन वाहन खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:13 AM2021-03-31T04:13:04+5:302021-03-31T04:13:04+5:30
फोटो पी ३० तिवसा तिवसा येथील घटना : वर्षभरापूर्वीच डीपीसीतून मंजूर तिवसा : तालुक्यातील सारसी-सातरगाव मार्गातील वनविभागाच्या जंगलातील आग ...
फोटो पी ३० तिवसा
तिवसा येथील घटना : वर्षभरापूर्वीच डीपीसीतून मंजूर
तिवसा : तालुक्यातील सारसी-सातरगाव मार्गातील वनविभागाच्या जंगलातील आग विझविण्यासाठी गेलेल्या तिवसा नगरपंचायतच्या अग्निशमन दलाचे नवीन वाहन जळून खाक झाल्याची घटना घडली. सोमवारी दुपारी ही घटना घडली. नगरपंचायतचे तीन कर्मचारी यात किरकोळ जखमीसुद्धा झालेत. अग्निशमन वाहनाची आग विझविण्यासाठी चांदूर रेल्वे पालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले होते.
तिवसा येथे जंगलाला आगी लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. ती आग नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर तिवसा अग्निशमन दलाच्या वाहनाला आग विझविण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. मात्र, ही आग विझविण्यापूर्वीच तिवसा नगरपंचायतचे वाहन जळून खाक झाले. यावेळी मुख्याधिकारी पल्लवी सोटे, माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे उपस्थित होते. तिवसा तालुक्यातील व शहरातील आगीच्या १२ घटना या वाहनाने निस्तरल्या होत्या.
वाहन नवीनच
वर्षभरापूर्वीच सदर अग्निशमन वाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन समितीतून नगरपंचायतला प्राप्त झाले होते. अजूनही त्यासाठी कायमस्वरूपी पदभरती झालेली नाही. जिल्हा प्रशासन व नगर विकास शाखेने या वाहनांवर कंत्राटी कर्मचारीही भरती केली नाही. तालुक्याच्या ठिकाणी अत्यंत आवश्यक असलेले हे वाहन जळून खाक झाले.