अमरावती जिल्ह्यातील नेरपिंगळाई परिसरात कांदा पिकाची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 06:16 PM2020-05-18T18:16:41+5:302020-05-18T18:17:02+5:30
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना खरिपातीलच शेतमाल विकता आलेला नाही. आता अवकाळी पावसाने कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्याने नेरपिंगळाई परिसरात शेतकरी पुन्हा आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कापूस, तूर, सोयाबीन पिकांनी पुरते गारद केले असताना, तीन दिवसांच्या अवकाळी पावसानेदेखील कांदाउत्पादकांच्या आशेवर पाणी फेरले. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना खरिपातीलच शेतमाल विकता आलेला नाही. आता अवकाळी पावसाने कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्याने नेरपिंगळाई परिसरात शेतकरी पुन्हा आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
तीन दिवसांपासून सायंकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने कांद्याचे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे पिकाचे संरक्षणही करता आले नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अद्यापही शेकडो शेतकऱ्यांचा कांदा उघड्यावर पडून आहे. पावसामुळे तो सडण्यास सुरुवात झाली असून, लाखो रुपयांच्या नुकसानाचा सामना करावा लागणार असल्याची चिंता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
नांदगावपेठमध्येही नुकसान
दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे नांदगावपेठ येथील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. संत्रा, कांदा आणि लिंबूच्या पिकांची पडझड झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. रामकृष्ण पोकळे, सुरेश भगत, विलास इंगोले, श्रीकृष्ण मुळे, प्रल्हाद पोकळे या शेतकऱ्यांना वादळाचा फटका बसला. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन धीर द्यावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.
कवडीमोलभावात विकला जातोय कांदा
शेतकऱ्यांचा कांदा निघण्यापूर्वी बाजारात येण्यापूर्वी त्याचे भाव तेजीत असतात. मात्र, बाजारपेठेत नवीन कांदा विकायला येताच दर पडतात. त्यात आता लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद आहेत. त्यामुळे कांदा चार ते पाच रुपये किलो दराने विकला जात आहे. शहरातील बाजारपेठ बंद असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी आपला माल विकू शकला नाही. अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्यावर नांगर फिरविला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर फार मोठे आर्थिक संकट उभे राहणार आहे.
विक्रीवर परिणाम
कांद्याची लिलाव प्रक्रिया बंद झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहतुकीची साधने व मालाची वाहतूक कमी झालेली असल्याने विक्रीवर परिणाम दिसून येत आहे.
कांद्याला लागली सड
कांदा काढण्यासाठी वेळेवर मजूर मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा अद्यापही शेतामध्ये उघड्यावरच पडून आहे. गेल्या तीन दिवसांपासून आलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा सडायला सुरुवात झाली आहे.