अचलपूरचा विकास खुंटला
By admin | Published: April 8, 2015 12:34 AM2015-04-08T00:34:42+5:302015-04-08T00:34:42+5:30
येथील अंतर्गत रस्त्यांची हालत खस्ता असून पथदिवे, आरोग्य सुविधा, दूषित पाणीपुरवठा या प्रश्नांकडे नगरपालिका पदाधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.
नगरसेवकांचा नाकर्तेपणा : नाल्या तुंबल्या, शहरात सर्वत्र घाणीचे वातावरण, दूषित पाणीपुरवठा
अचलपूर : येथील अंतर्गत रस्त्यांची हालत खस्ता असून पथदिवे, आरोग्य सुविधा, दूषित पाणीपुरवठा या प्रश्नांकडे नगरपालिका पदाधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. नगरसेवकही समस्या सोडविण्याच्या मानसीकतेत दिसत नाही. परतवाड्याच्या तुलनेत अचलपूरला संख्येने जास्त नगरसेवक असूनही या समस्या सुटण्यापेक्षा दिवसेंदिवस वाढत आहे.
नगरपरिषद १० प्रभागात विभागली गेली आहे. त्यात अचलपूरला सहा प्रभाग आहेत. नगरसेवकांची संख्याही येथे भरभक्कम आहे. येथील नगरसेवक संख्येने जास्त असूनही या शहराची बकाल अवस्था झाली आहे. त्यामुळे ७० हजारापेक्षाही जास्त लोकसंख्या असलेले हे शहर एक मोठे खेडे वाटत आहे. लोकप्रतिनिधी आपल्या तुंबड्या भरण्याच्या नादात असून त्यांच्या समस्येशी काही घेणे-देणे नाही, असा नागरिकांचा आरोप आहे.
५२ वसाहती मिळून अचलपूर शहर बनले आहे. येथे हिंदू-मुस्लीम गुण्यागोविंदाने एकत्र राहात असले तरी संवेदनशील शहर म्हणून अचलपूरची नोंद पोलीस दप्तरी आहे. नेते मंडळी विकासाच्या नावावर राजकारण करण्याऐवजी जाती-धर्माचे राजकारण करीत असल्याचे चित्र आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकांचे वेळी विकासाऐवजी जात, धर्म आणि पैसा हे तिनच निकष बहूसंख्य लोक लावत असल्याने येथे विकासाची बोंब आहे. त्यामुळे विकास न होण्यास काही अंशी जनताही कारणीभूत आहे, असे म्हटल्यास चूक ठरणार नाही. अनेकदा शहरातील पथदिवे दिवसा सुरू असतात. वाहणाऱ्या नाल्या, सिमेंट काँक्रीटचे नाले अर्धे गाळानी भरले आहेत.
दूषित पाणीपुरवठा
सध्या स्वाईन फ्लूचा कहर सर्वत्र सुरू आहे. शहरातही याची लागण झाली आहे. हा आजार होण्यास वराहांची वाढलेली संख्या व दूषित पाणी पुरवठा हे दोन मुख्य कारण असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती सांगतात. येथील दुल्हा गेट जवळील पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टाकीवर झाकन नसल्याने त्यात कचरा, चपला, पक्षी, प्राणी मध्यंतरीच्या काळात आढळून आले होते. गेल्या काही दिवसापूर्वी जलवाहिनीतून सडलेला कुत्रा निघाला होता. अजूनही अनेक ठिकाणी जलवाहिन्या लिकेज झालेल्या आहेत. आदी कारणांनी जनतेला दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने मळमळणे, थंडीताप, डोकेदुखी, अज्ञात ताप आदी आजारांनी बहुसंख्य लोक आजारी आहेत.
रस्त्यांचे हाल खस्ता
येथे सर्वात मोठी समस्या रस्त्यांची आहे. रस्त्यांमध्ये ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. बिलनपूरा टकुर चौक, गांधी पूल, जगदंब देवी संस्था, जुना सराफा आदी ठिकाणच्या रस्त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. दुल्हा गेट, चावलमंडी, खिडकी गेट, टकुर चौक, देवडी येथील मुख्य रस्ते खड्डेग्रस्त आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे समजणेही कठीण आहे.
अचलपूरचे नगरसेवक संख्येने जास्त आहेत हे खरे आहे. प्रत्येक नगरसेवक आपल्या वॉर्डात कामे टाकावी यासाठी प्रयत्नशिल असतो. काही मंडळी काही अधिकारी कायदे, नियमांच्या आडकाठ्या आणून विकासात अडथळा आणतात. त्यामुळे नगरसेवकांना प्रत्येक वेळी दोष देऊन चालणार नाही.
- संजय भोंडे, नगरसेवक.
आम्ही भाजपाचे असल्याने आमच्या मागण्यांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होते. शहरात रस्ते, पाणी, नाल्या आदी समस्या आहेत. आम्ही विकासासाठी कधीही एकत्र यायला तयार आहोत. पण सर्वांनी जनसमस्या सोडविण्यासाठी निस्वार्थीपणे मोकळ्या मनाने एके ठिकाणी बसावे व आपल्या शहराचे अस्तित्व दाखवून समस्या मार्गी लावाव्या.
-नितीन डकरे, नगरसेवक.