लघुसिंचन प्रकल्पावर वैरण विकास शक्य!
By admin | Published: February 1, 2015 10:48 PM2015-02-01T22:48:20+5:302015-02-01T22:48:20+5:30
पावसाच्या १२० दिवसांत केवळ ४३ दिवस पाऊस पडला. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन उद्धवस्त झाले. जिल्ह्यात वैरणासाठी किमान ७० टक्के प्रमाणात सोयाबीन कुटीचा वापर होतो.
गजानन मोहोड - अमरावती
पावसाच्या १२० दिवसांत केवळ ४३ दिवस पाऊस पडला. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन उद्धवस्त झाले. जिल्ह्यात वैरणासाठी किमान ७० टक्के प्रमाणात सोयाबीन कुटीचा वापर होतो. परंतु यंदा सोयाबीनच नसल्यामुळे उन्हाळ्यात वैरण टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैरण विकास कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लघु व मध्यम सिंचन प्रकल्पावर ‘कमांड ऐरियात’ वैरण विकासाच्या योजना राबविल्यास चारा टंचाईवर मात करता येऊ शकते, असे जलसंपदाचे निवृत्त मुख्य अभियंता नारायण परिहार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दशकापूर्वी पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने अमरावती विभागात अशा योजना राबविल्या होत्या, असे परिहार यांनी सांगितले.
पशुधन संगोपनात, पशूधनाची शारीरिक वाढ, प्रजोत्पादन दुग्ध उत्पादन व आरोग्य संवर्धन तसेच पशुधनापासून अपेक्षित लाभ मिळणे आवश्यक आहे. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी वैरणाची आवश्यकता आहे.
यंदा मात्र जिल्ह्यात सर्वाधिक असणारे सोयाबीनचे कुटाराची टंचाई आहे त्यामुळे सुधारित, संकरित व अधिक उत्पादन देणाऱ्या एकदल, द्विदल तसेच गवतवर्गीय प्रजातीची लागवड करून वैरण उत्पादन वाढविणे व कमी खर्चात पशुधनासाठी प्रथिनेयुक्त सकस आहार उपलब्ध करण्यासाठी जिल्ह्यात वैरण विकासाचा कार्यक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात लहानमोठे सिंचन प्रकल्प आहेत. खंडीत पावसाने सोयाबीनची वैरण नसली तरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामधील शेतकऱ्यांना वैरण विकासाचा कार्यक्रम अनुदानावर दिल्यास १० लाखावर पशुधनाला हिरवा, सकस व पौष्टीक चारा उपलब्ध होईल.