स्मार्ट सीटीत शहराचा विकास; खेडे मात्र भकास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 10:49 PM2018-08-14T22:49:06+5:302018-08-14T22:49:26+5:30
रस्ते, वीज व निवारा या मूलभूत सुविधाही अजून पूर्णत्वास गेल्या नाहीत, ही व्यथा आहे वडुरा या गावाची. स्मार्ट सिटीत शहराचा विकास होत असला तरी खेडे मात्र, स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही भकास आहेत.
संजय जेवडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : रस्ते, वीज व निवारा या मूलभूत सुविधाही अजून पूर्णत्वास गेल्या नाहीत, ही व्यथा आहे वडुरा या गावाची. स्मार्ट सिटीत शहराचा विकास होत असला तरी खेडे मात्र, स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही भकास आहेत.
वडुरा या गावातील ग्रामपंचायतीची इमारत पुरातन असून, शिकस्त झाली आहे. भिंतीला तडे गेले असून, ती केव्हा कोसळेल याचा नेम नाही. पावसाचे पाणी गळू नये म्हणून छताला प्लास्टिकचे कव्हच लावले आहे. येथूनच या गावाच्या दुर्दशेची खरी सुरूवात होते. तेथील लोकसंख्या १,३२७ असून, गावात ४८४ कुटुंबे राहतात. त्यांची उपजिविका शेती व शेतमजुरीवरच अवलंबून आहे. त्यात पारधी बेड्यावरील ९० टक्के लोक केवळ मजुरीवर अवलंबून आहेत.
येथील इंदिरा आवास झोपडपट्टीत अजून विद्युत पोल नसल्याने पथदिव्यांची सोय नाही. नागरिकांनी व ग्रामपंचायतीने केबल टाकून पथदिवे लावण्याचा प्रयत्न केला. पण, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पोल शिवाय पथदिवे लावता येत नाही या सबबीखाली ते काढून नेले. त्यामुळे तेथील रस्त्यावर अंधार आहे व रस्त्याने पायदळही चालणे कठीण झाले आहे. या गावातील नाल्यांचे बांधकाम बरेच जुने व अरूंद असल्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरते. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. नाली बांधकामासाठी निधीची गरज आहे. मधुकरराव शेटे यांच्या घरापासून ते गोठाण नाला आणि गोविंदराव चोखट यांच्या घरापासून ते पुलाच्या नाल्यापर्यंत नाली बांधकाम गरजेचे आहे. येथील कोंडवाड्याच्या भिंती कोसळल्याने ग्रामपंचायतीचे उत्पन्न बुडाले. येथून महाविद्यालयात जाणारे विद्यार्थ्यांना व १२ वी पर्यंतच्या शिक्षणासाठी गावात येणाºया विद्यार्थ्यास बसेसची सोय नाही. येथील वीजपुरवठा लोणी (टाकळी) विद्युत केंद्रावरून होतो. भारनियमनाव्यतिरिक्त कृषीधारकांना वेळापत्रकानुसार वीजपुरवठा होत नाही आदी समस्यांनी या गावाला वेढले आहे. पाच वर्षांपासून ओ.बी.सींना घरकूल मिळाले नाही. येथील भीमराव सहारे हे निवाºयाअभावी समाज मंदिरात वास्तव्याला आहेत. गजानन सहारे (अपंग), शंकर ठाकरे, ज्ञानेश्वर राऊत, रतन नेवारे, जयंताबाई राऊत, भाऊराव राऊत यांचे कुटुंब कुडाच्या घरात राहतात, असे दत्ता बेलोरकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
ग्रामपंचायतीचे बांधकाम, इंदिरा आवास प्लॉटमध्ये विद्युत पुरवठ्यासाठी पोल, शेतात जाणारे पांदण रस्ते तयार करण्यासाठी विविध निधीची आवश्यकता आहे.
- कुंजलता बेलोरकर,
सरपंच, वडुरा
गावातील रस्ते व स्मशानभूमीत जाणाºया रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा व पारधी बांधवांसाठी पूरक व्यवसाय व रोजगाराची संधी शासनाने उपलब्ध करून द्यावी.
- चंचलाबाई सातंगे,
उपसरपंच, वडुरा
ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी आहे. त्यातून पाणीपुरवठा, वीज देयके, कर्मचारी वेतन व नाल्या सफाई यावर खर्च होतो. मोठी विकासकामे निधीशिवाय होऊ शकत नाहीत.
- नीतेश गेडाम,
ग्रामसेवक, वडुरा