राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतूनच गावाचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 09:33 PM2018-10-27T21:33:55+5:302018-10-27T21:34:21+5:30
राष्ट्रसंतांचा विचार ग्रामगीतेच्या माध्यमातून जगात पोहोचला पाहिजे. गावाचे नियोजन व सहभाग ग्रामगीतेत सांगितल्याप्रमाणे केल्यास आदर्श गावाची निर्मिती प्रत्येक गावात होऊ शकते, असे प्रतिपादन आदर्श गावाचे शिलेदार पोपटराव पवार यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गुरुकुंज मोझरी : राष्ट्रसंतांचा विचार ग्रामगीतेच्या माध्यमातून जगात पोहोचला पाहिजे. गावाचे नियोजन व सहभाग ग्रामगीतेत सांगितल्याप्रमाणे केल्यास आदर्श गावाची निर्मिती प्रत्येक गावात होऊ शकते, असे प्रतिपादन आदर्श गावाचे शिलेदार पोपटराव पवार यांनी येथे केले. सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवात ‘ग्रामगीताप्रणित आदर्श गावांची यशोगाथा’ या विषयावर पोपटराव पवार यांची मुलाखत सिनेअभिनेते भारत गणेशपुरे यांनी घेतली. यावेळी अभिनेत्री श्रेया बुगडे उपस्थित होत्या. ‘चला हवा येऊ द्या’च्या या जोडीने मुलाखत खुमासदार केली.
व्यासपीठावर सरपंच संघटनेचे अध्यक्ष गजानन बोंडे, आदर्श ग्राम देवगाव येथील गजानन येवले, राजस्थान रॉयल्स क्रिकेट संघाचे व्यवस्थापक रोमी भिंडर, कॉर्पोरेट प्रशिक्षक सुमंत टेकाडे, अविनाश काकडे, अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ, सरचिटणीस जनार्दन बोथे, उपसर्वाधिकारी लक्ष्मण गमे, प्रचारप्रमुख दामोदर पाटील, कार्यकारी सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुडे, दिलीप कोहळे, घनश्याम पिकले, भानुदास कराळे, विलास साबळे, सूर्यप्रकाश जयस्वाल उपस्थित होते.
विकासाची मानसिकता नसणे हीच खरी समस्या आहे. दत्तकग्राम योजना कुचकामी असून, गावकऱ्यांचे सहकार्याऐवजी अनुदान कुठे मिळेल, याकडेच लक्ष लागते. त्यामुळे सरकारने सगळं केलं पाहिजे, ही भावनादेखील वाढीस लागते. ज्या जिल्ह्यात दारूबंदी केली आहे, त्याच जिल्ह्यात सर्वात जास्त दारू विकली जाते. त्यामुळे दारूबंदी करावयाची असल्यास महिलांच्या सक्रिय समावेशाची आवश्यकता आहे. ग्रामगीतेच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण केले असून, ग्रामगीतेच्या आचरणातून या देशातील समस्या सुटू शकतात, असे पवार म्हणाले.
आज ग्रामगीताचार्य पदवीदान समारंभ
राष्ट्रसंताच्या पुण्यतिथी महोत्सवात २८ आॅक्टोबरला सकाळी ९ ते ५ या वेळेत ग्रामगीता जीवन विकास परीक्षा संमेलन व ग्रामगीताचार्य पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन प्रदीप विटाळकर व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मुरलीधर चांदेकर करतील. पहाटे सामुदायिक ध्यानाच्या महत्त्वावर दिलीप कोहळे चिंतन व्यक्त करतील. एकनाथ राऊत यांचे ग्रामगीता प्रवचन करतील. सायंकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थनेच्या महत्त्वावर राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी चिंतन प्रस्तुत करतील. रात्री ८.३० पासून अनुक्रमे ज्ञानेश्वर महाराज वाघ व उद्धवराव गाडेकर यांचे कीर्तन होणार आहे.
ओमेश्वरी बंडचा सत्कार
कार्यक्रमात विद्यापीठात इंग्रजी विषयात सुवर्णपदकाची मानकरी ओमेश्वरी बंड हिचा प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार करण्यात आला. अमरावती येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य महाविद्यालय व महात्मा फुले महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंतांची सुरेल भजने गाऊन वाहवा मिळविली. संचालन मानवछात्रालयाचे अधीक्षक अमोल बांबल यांनी केले.