बेलोरा विमानतळावर ३९.३३ कोटींच्या निधीतून विकासकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:49 AM2019-04-22T00:49:24+5:302019-04-22T00:49:46+5:30
जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळावर ३९.३३ कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामे होणार आहेत. यामध्ये 'रन-वे'ची लांबी वाढविणे, अप्रॉन जीएसई, ड्रेनेज व्यवस्था, अप्रोच रस्ते निर्मिती आदी कामांचा समावेश असणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळावर ३९.३३ कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामे होणार आहेत. यामध्ये 'रन-वे'ची लांबी वाढविणे, अप्रॉन जीएसई, ड्रेनेज व्यवस्था, अप्रोच रस्ते निर्मिती आदी कामांचा समावेश असणार आहे. ३० एप्रिल रोजी निविदा उघडणार असून, त्यानंतर विकासकामांसाठी एजन्सी नेमली जाणार आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या नियंत्रणात बेलोरा विमानतळाचे विविध विकासकामे पूर्णत्वास जाणार आहे. बेलोरा विमानतळावर प्रस्तावित विकासकामांच्या निर्मितीकरिता यापूर्वीच निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. ६ मार्च २०१९ रोजी निविदा प्रकाशित करण्यात आल्या होत्या. २६ मार्च रोजी प्री-बीड बैठकीनंतर २८ मार्च रोजी बीड सादर करण्यात आले. आता २९ एप्रिल रोजी कागदपत्रांचे डाऊनलोडींग आणि कागदपत्राचे अंतिम सादरीकरण केले जाईल. तसेच मुंबई येथील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या कार्यालयात ३० एप्रिल रोजी अंतिम निविदा उघडल्या जातील. निविदेअंती अटी, शर्तीनुसार एजन्सी नेमली जाणार आहे. त्यानंतर नियमानुसार एजन्सीला १२० दिवसांत सिव्हील बांधकाम पूर्ण करावे लागणार आहे. विशेषत: नाईट लॅडिंग, रन-वे लांबी वाढविण्याच्या कामाला प्रारंभ होणा आहे. सांडपाणी व्यवस्थापन, अंतर्गत व बाह्य रस्ते निर्मिती, संरक्षण भिंतीचे बांधकाम केले जाणार आहे. विमानांच्या नाईट लॅडिंगसंदर्भात विमानतळ परिसरात ११ केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र उभारले जाणार आहेत.
अमरावती लोकसभा निवडणूक पार पडल्याने आचारसंहिता शिथिल झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने बेलोरा विमानतळाच्या विविध विकासकामांच्या निविदा ३० एप्रिल रोजी उघडण्याचे निश्चित केले आहे. लवकर बेलोरा येथून विमान सेवा सुरू होईल.
- सुनील देशमुख, आमदार
टर्मिनस बिल्डिंग, एटीएस टॉवरची उभारणी
बेलोरा विमानतळाहून विमानसेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने विकासकामांच्या निविदा उघडण्याची तयारी चालविली आहे. यापूर्वीच माती परीक्षण, विद्युत सर्वेक्षण आटोपले आहे. तर, राईट्स कंपनीकडून टर्मिनस बिल्डिंग, एटीएस टॉवर उभारणीचा नकाशा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार लवकरच उभारणी केली जाणार आहे.