देवेंद्र भुयार यांचा जामीन नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 01:33 AM2019-05-30T01:33:30+5:302019-05-30T01:33:49+5:30
जिल्हा परिषदेतील पाणीटंचाईच्या विशेष सभेत सदस्य देवेंद्र भुयार यांनी गटविकास अधिकाऱ्यांवर बॉटल भिरकावल्याची घटना मंगळवारी घडली. शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी देवेंद्र भुयार यांना गाडगेनगर पोलिसांनी अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले. त्यांचा जामीन न्यायालयाने नाकारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेतील पाणीटंचाईच्या विशेष सभेत सदस्य देवेंद्र भुयार यांनी गटविकास अधिकाऱ्यांवर बॉटल भिरकावल्याची घटना मंगळवारी घडली. शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी देवेंद्र भुयार यांना गाडगेनगर पोलिसांनी अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले. त्यांचा जामीन न्यायालयाने नाकारला.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात घडलेल्या या घटनेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांमार्फत गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली गेली. पोलिसांनी देवेंद्र भुयार यांना घटनास्थळाहून ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३५३ अन्वये गुन्हा नोंदविला. अटक करून त्यांना शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले. बुधवारी गाडगेनगर पोलिसांनी देवेंद्र भुयार यांना प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी (३) एस.ए.देशपांडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली.
दरम्यान, देवेंद्र भुयार यांच्यातर्फे वकील शशांक डबरासे यांनी सीआरपीसीच्या कलम ४३७ नुसार न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. त्यांनी उच्च न्यायालयाचे दाखले देत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, भादंविच्या कलम ३५३ गुन्ह्याचा खटला जिल्हा व सत्र न्यायालयातील असला तरी त्यामध्ये जेएमएफसी न्यायालयास जामीन देण्याचे अधिकार आहे.
फाशी किंवा आजीवन कारावास अशा प्रकारची मोठी शिक्षा या गुन्ह्यात नसल्यामुळे आपण या कमी शिक्षेच्या खटल्यात आरोपीला जामीन द्यावा, अशी बाजू वकील शशांक डबरासे यांनी न्यायालयासमोर मांडली. या गुन्ह्याचा तपास सुरू असल्यामुळे न्यायालयाने देवेंद्र भुयार यांचा जामीन नाकारला.