देवेंद्र भुयार यांनी बीडीओवर भिरकावल्या पाणी बॉटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 01:37 AM2019-05-29T01:37:51+5:302019-05-29T01:38:58+5:30
जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना, जिल्हा परिषदेच्या उपाययोजना अद्यापही कागदावरच असल्याचा आरोप करीत झेडपी सदस्य देवेंद्र भुयार यांनी वरूड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष बोपटे या अधिकाऱ्यांच्या अंगावर पाण्याच्या बॉटल भिरकावल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना, जिल्हा परिषदेच्या उपाययोजना अद्यापही कागदावरच असल्याचा आरोप करीत झेडपी सदस्य देवेंद्र भुयार यांनी वरूड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष बोपटे या अधिकाऱ्यांच्या अंगावर पाण्याच्या बॉटल भिरकावल्या. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे प्रशासन पाणीटंचाईच्या मुद्द्याला नियोजनाची जोड देत नसल्याच्या कारणावरून मंगळवारी दुपारी झेडपीच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात हा हायव्होटेज ड्रामा रंगला.
निमित्त होते, जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाईच्या विशेष सभेचे. देवेंद्र भुयार यांनी बॉटल भिरकावल्याने अधिकाऱ्यांनी सभागृहातून बहिर्गमन केले. याप्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात सीईओंमार्फत तक्रार नोंदविली गेली. पोलिसांनी देवेंद्र भुयार यांना ताब्यात घेतले. त्यानंतर या नाट्यावर पडदा पडला. दरम्यान, अधिकाºयांच्या अंगावर बॉटल भिरकावल्याच्या परिणामी गोंधळातच जिल्हा परिषदेची सभा गुंडाळण्यात आली.
ग्रामीण भागातील पिण्याच्या पाणीटंचाईच्या मुद्यावर २८ मे रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेला जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, आरोग्य सभापती बळवंत वानखडे, बांधकाम सभापती जयंत देशमुख, समाजकल्याण सभापती सुशीला कुकडे, मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री, प्रभारी अतिरिक्त सीईओ आनंद भंडारी, डेप्युटी सीईओ नारायण सानप, पाणीटंचाईच्या सभेला दूपारी दीड वाजता सुरुवात झाली. यावेळी प्रारंभी सदस्य गौरी देशमुख यांनी गुरुदेवनगर व मोझरी येथील पाणीटंचाईच्या मुद्यावर आक्रमक होत झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे व सीईओ मनीषा खत्री यांना घागरी भेट दिल्या. मात्र, दोघांनी त्या नाकारल्याने पदाधिकारी व सीईओ यांच्यात यावेळी शाब्दिक चकमक झाली. यावर पडदा पडताच सभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले असताना, वरूड तालुक्यातील पाणी टंचाईच्या मुद्यावर देवेंद्र भुयार यांनी तालुकास्तरीय पाणी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली नसल्याचा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित करत वरूड येथील गटविकास अधिकारी सुभाष बोपटे यांना जाब विचारला.
सभागृहात सीसीटीव्ही लावा
जिल्हा परिषदेतील सभांच्या कामकाजात पारदर्शकता व सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, अशी मागणी रवींद्र मुंदे, सुहासिनी ढेपे, प्रवीण तायडे, सुनील डिके आदींनी मुख्यकार्यपालन अधिकारी मनीषा खत्री यांच्याकडे केली आहे. यावर तातडीने कारवाई केली जाईल व आवश्यकतेनुसार सुरक्षाही तैनात केली जाणार असल्याचे खत्री यांनी सांगितले.