देवेंद्र भुयार यांच्या उमेदवारीला वरुडात भाजपातून तीव्र विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 11:19 AM2024-08-24T11:19:11+5:302024-08-24T11:21:29+5:30

Amravati : स्थानिक आमदार निकष अमान्य; आ. चंद्रशेखर बावनकुळे, खा. डॉ. अनिल बोंडे, आशिष देशमुख यांच्यासमक्ष भाजप पदाधिकारी संतप्त

Devendra Bhuyar's candidature strongly opposed by BJP in Varuda | देवेंद्र भुयार यांच्या उमेदवारीला वरुडात भाजपातून तीव्र विरोध

Devendra Bhuyar's candidature strongly opposed by BJP in Varuda

लोकमत न्यूज नेटवर्क 
वरूड :
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, खा. डॉ. अनिल बोंडे, माजी आ. आशिष देशमुख यांच्या उपस्थितीत येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवारी वरूड येथे भाजपचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी भाजपचे पदाधिकारी, जुन्या- जाणत्या नेत्यांनी महायुतीतून आमदार देवेंद्र भुयार यांना उमेदवारी देऊ नका, असा सज्जड इशारा देत उमेदवारीला तीव्र विरोध दर्शविला. तब्बल तीन, साडेतीन तास चाललेल्या या मेळाव्यात आमदार भुयार नकोच, अशीच रोखठोक भूमिका भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी घेतली. 


नुकत्याच झालेल्या वर्धा लोकसभा निवडणुकीत मोर्शी-वरूडमध्ये भाजप उमेदवार आघाडीवर होते. रामदास तडस यांना ९० हजार मते मिळाली होती. ही मते भाजपचे असून यात स्थानिक आमदार देवेंद्र भुयार यांचा काडीचाही वाटा नाही. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतून वरूड-मोर्शी मतदार संघ हा भाजपच्या वाट्याला यावा, अशी एकमुखी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढ्यात ठेवली. 


विधानसभेची उमेदवारी देताना स्थानिक आमदार हे निकष मोर्शी वरूड मतदार संघासाठी लागू करू नका, अशा भावना भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. लोकसभा निवडणुकीत स्थानिक आमदार देवेंद्र भुयार कोठेही दिसून आले नाही. महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी ते फिरकले नाहीत. मोर्शी-वरुड मतदार संघातून ९० हजार मते हे केवळ भाजपचे असून यात आ. भुयार यांचा कोणताही वाटा नाही, असे पदाधिकाऱ्यांनी निक्षून सांगितले. 


महायुतीच्या घटक पक्षाला विचारले तरीही मोर्शीतून भाजपचा उमेदवार द्या, अशीच मागणी पुढे येईल, अशा संतप्त भावना या मेळाव्यातून भाजप कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समक्ष मांडल्या. काहीही झाले तरी मोर्शी मतदार संघ महायुतीतून भाजपच्या पदरात पाडू, अन्यथा विधानसभेत याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देत भाजप पदाधिकाऱ्यांनी आ. देवेंद्र भुयार यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शविला, हे विशेष.

Web Title: Devendra Bhuyar's candidature strongly opposed by BJP in Varuda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.