Video: देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री, नवनीत राणांनी जाहीर सभेतच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 04:01 PM2023-01-11T16:01:12+5:302023-01-11T16:05:44+5:30
देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री असल्याचं म्हटलं.
राज्यात ५ विधानपरिषद निवडणुकांची घोषणा झाली असून शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांवर ही निवडणूक होत आहे. भाजप आणि महाविकास आघाडी या निवडणुकांच्या रिंगणात उतरली असून प्रचारालाही सुरुवात झाली आहे. नागपूर, अमरावती, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या ५ मतदारसंघात ही निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे जाहीर सभा घेतली. या सभेला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा याही उपस्थित होत्या. यावेळी, बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री असल्याचं म्हटलं.
अमरावती मतदारसंघातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील भाजप उमेदवार डॉ.रणजीत पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ संवाद सभेत खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. राणा यांचा हा व्हिडिओही व्हायरल होत आहे. देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. सगळ्यांना आपण उपमुख्यमंत्री वाटतात. पण, आमची कामे ज्या पद्धतीने आपण करता, त्यामुळे आमची मनातून इच्छा आहे की आमचे मुख्यमंत्री आपणच आहात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत यात माझ्या मनात शंका नाही, असे म्हणत आमदार नवनीत राणा यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच त्याचं कौतुक केलं.
अमरावती - तुम्हीच आमच्या मनातील मुख्यमंत्री : नवनीत राणा pic.twitter.com/AnXQyDPVZM
— Lokmat (@lokmat) January 11, 2023
अमरावतीत राणा आणि बच्चू कडू यांच्यात काही दिवसांपूर्वी चांगलाच वाद रंगला होता. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा वाद मिटवला. मात्र, शिंदे गटाचे आमदार असलेल्या बच्चू कडूंसोबतचा आमदार राणा यांचा वाद राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा ठरला होता. आता, नवनीत राणा यांनी थेट उपमुख्यमंत्री फडणवीस हेच आमचे मुख्यमंत्री असल्याचं म्हटल्याने शिंदे गटातील आमदार काय म्हणतील, किंवा ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खासदार राणा यांच्या विधानावर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून काय प्रतिक्रिया येतात, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.