अमरावती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी देविदास पवार ‘जॉईन’
By प्रदीप भाकरे | Published: February 6, 2023 06:02 PM2023-02-06T18:02:22+5:302023-02-06T18:05:15+5:30
अनुभवसंपन्न : आयुक्तांनी केले स्वागत
अमरावती : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून मुख्याधिकारी संवर्गाचे ज्येष्ठ अधिकारी देविदास पवार यांनी सोमवारी पदाची सूत्रे स्वीकारली. तत्पूर्वी, त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना रिपोर्टिंग केले. सोमवारच्या एचओडी बैठकीतदेखील पवार यांनी उपस्थिती दर्शविली. हर्षल गायकवाड यांच्या बदलीच्या सहा महिन्यानंतर महापालिकेला पवार यांच्या रूपात तिसरे अतिरिक्त आयुक्त मिळाले आहे.
प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशाच्या अनुषंगाने नगरविकास विभागाने देविदास पवार यांची अमरावती महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी पुनर्नियुक्ती केली. तसा आदेश ३ फेब्रुवारी रोजी काढला. त्याआदेशानुसार, पवार हे सोमवारी सकाळी महापालिकेत रुजू झाले. प्रशासकीय कामकाजाचा दिर्घ अनुभव असलेल्या पवार यांनी अलिकडे परभणी व जळगाव महापालिका आयुक्त म्हणून सेवा दिली आहे. येथे त्यांच्याकडे कुठले विभाग राहतील, याबाबत आयुक्तांनी तूर्तास आदेश काढलेले नाहीत. अतिरिक्त आयुक्तांसोबतच पवार यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात उपायुक्त प्रशासन या पदाचा प्रभार देण्याचे संकेत प्रशासनप्रमुखांनी दिले आहेत.
सहा महिन्यानंतर मिळाले ॲडिशनल
हर्षल गायकवाड हे २९ एप्रिल २०२२ रोजी अमरावती महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून रूजू झाले होते. मात्र, अवघ्या तीन महिन्यातच त्यांची वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून बदली झाली. त्यामुळे सहा महिन्यांपासून अतिरिक्त आयुक्तपद रिक्त होते. ऑगस्टमध्ये देविदास पवार यांची येथे नियुक्ती झाली होती. मात्र, ते बदली रद्द करून घेण्यात यशस्वी झाले होते. त्यांची जळगाव आयुक्त म्हणून वर्णी लागली. मात्र, मॅटच्या आदेशानुसार पवार हे ६ फेब्रुवारी रोजी अमरावती महापालिकेत रुजू झाले.