धामणगाव काटपूर येथे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
By admin | Published: November 28, 2015 01:22 AM2015-11-28T01:22:06+5:302015-11-28T01:22:06+5:30
मोर्शी तालुक्यातील धामणगाव (काटपूर) येथे स्मशानभूमी व रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला आहे.
अमरावती : मोर्शी तालुक्यातील धामणगाव (काटपूर) येथे स्मशानभूमी व रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला आहे. आयुर्वेदिक दवाखान्याच्या बांधकामातही कमी जाडीचा स्लॅब टाकण्यात आल्याने दवाखाना केव्हाही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात नागरिकांनी मोर्शीच्या खंडविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
गावातील स्मशानभूमीचे बांधकामाचे बेड काँक्रीट कॉलम हे एकाच दिवशी सहा फूट भरण्यात आला. त्याच दिवशी क्युरिंंग न करता त्या कॉलमच्या खड्ड्यात मुरुम न टाकता काळी माती टाकण्यात आली. लगेच दुसऱ्या दिवशी वर बांधकाम करण्यात आले. बांधकामात वापरण्यात आलेली रेती ही मातीमिश्रित असल्याचे आढळून आले. तसेच रस्त्याचे मातीकाम अंदाजपत्रकात ०.४५ मीटरचे दिले असतानाच ०.३० मीटरही करण्यात आले नाही. त्या खोदकामात ८० एमएम बोल्डरऐवजी मुरुम व मोठे मुरुमाचे दगडच टाकण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता चांगला तयार झाला नाही. पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यावर आणखी चिखल तुडवीत जाण्याची वेळ नागरिकांवर येणार आहे. त्यामुळे कामाची चौकशी होणे गरजेचे झाले आहे.
याबाबत सचिव व सरपंच ग्रामपंचायत धामणगाव यांना सांगितले असता त्याने कुठेही तक्रार करा, कुणीच माझे काही वाकडे करू शकत नाही, असे उद्धट उत्तर दिले. अंदाजपत्रकाप्रमाणे त्या जागेवरील साफसफाई व झाडे झुडपे तोडणे व लेव्हल मारण्यात आली नाही. स्मशानभूमी, रस्ता आणि आयुर्वेदिक दवाखान्याच्या बांधकामाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी अविनाश सुंदरकर, प्रमोद इंगोले, बाबुराव सुंदरकर, कैलास आकोलकर, प्रमोद वैराळे, नीरज अटाळकर, नीलेश अमृते, आशिष गांजरे, प्रदीप गांजरे, अमोल भुजाडे, दिलीप सुंदरकर, संजय माहोलकर, गजानन अमृते, राधेशाम सुंदरकर, साहेबराव खडसे आदींनी मोर्शी पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी यांचेकडे केली आहे. तसेच मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिषद उपविभागीय अधिकारी, मोर्शी यांनाही देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)