धामणगावच्या सिमेंट रोडचे पडले तुकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 10:55 PM2018-02-13T22:55:25+5:302018-02-13T22:56:27+5:30

Dhamangaon's Cement Road torn pieces | धामणगावच्या सिमेंट रोडचे पडले तुकडे

धामणगावच्या सिमेंट रोडचे पडले तुकडे

Next
ठळक मुद्दे'जेपी'वर फौजदारी केव्हा? : वेबसाईटवर मात्र दर्जेदार रस्त्याचे चित्र

आॅनलाईन लोकमत
अमरावती : राज्यातील अनेक शहरांत दर्जेदार सिमेंट रस्ते बांधल्याची जाहिरात करणाऱ्या जे.पी.एंटरप्रायझेस या बांधकाम कंपनीचा मुखवटा कसा खोटा आणि फसवणूक करणारा आहे, हे धामणगावच्या तुटलेल्या सिमेंट रस्त्यावरून उघड झाले आहे. निकृष्ट काम करणाऱ्या याच कंपनीकडे अमरावती-बडनेरा शहरांतील कोट्यवधी रुपयांची सिमेंट रस्त्यांची कामे आहेत.
जे.पी. एन्टरप्रायझेसतर्फे त्यांच्या संकेत स्थळासह विविध जाहिरातींमध्ये दर्जेदार कामाचे श्रेय लाटण्यासाठी धामणगाव येथील सिमेंट रस्त्याच्या कामाचा दिमाखाने उल्लेख केला जातो. धामणगाव शहरातील सिमेंट रोडचे छायाचित्रही या कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर अपलोड केले आहे. स्वच्छ व अखंड रस्ता या चित्रात दाखविण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र धामणगाववासीयांची फसगत झाल्याची स्थिती आहे. धामणगाव अंजनसिंगी हा सिमेंट रस्ता मुदतीपूर्वीच अनेक तुकड्यांमध्ये विभागला गेला आहे. या रस्त्याचा शुभारंभ १९९७ साली करण्यात आला होता. अवघ्या काही वर्षांतच या रस्त्याची शकले पडली.
नगरपालिकांतर्गत राज्यभरात बहुदा पहिला सिमेंट रस्ता बांधण्याचा अभिनंदनीय निर्णय धामणगाव नगरपालिकेने २० वर्षांपूर्वी घेतला. तथापि किमान ५० वर्षांपर्यंत सिमेंट रस्त्याचे आयुष्य असल्याचे सांगणाºया 'जे.पी.'ने धामणगावातील तो रस्ता लुटीची संधी समजून निकृष्ट काम केले. जाणकारांच्या मतानुसार, आवश्यक ते लोखंड, दर्जेदार सिमेंट आणि योग्य क्युरिंग न केल्यामुळे रस्त्याचे तुकडे पडलेत. सिमेंट रस्ता हा कुतूहलाचा विषय असतानाच्या काळातच 'जे.पी.' इतके निकृष्ट काम करीत असेल, तर गल्लीबोळात सिमेंट रस्त्यांचा सुळसुळाट असलेल्या काळात ही कंपनी अमरावती शहरात किती निकृष्ट काम करीत असेल; याचा केवळ अंदाजच बांधलेला बरा.
तडे आणि भेगा
धामणगाव रस्त्यावर लांबीला समांतर तडे गेले आहेत. तडे आरपार असल्यामुळे रस्त्याची लांब शकलेच पडली. रस्ता मध्यभागातून दोन्ही बाजूंनी सरकल्यामुळे भलीमोठी भेग तयार झाली. दिवसेंदिवस ही भेग मोठीच होत आहे. सुमार कामाचा हा दृश्य परिणाम झाकण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाने आटोकाट प्रयत्न केला. परंतु, रस्ता विद्रुप होण्याशिवाय त्याचा फारसा उपयोग झाला नाही. बांधकाम अधिकाºयांनी या भेगेत चक्क डांबर भरले. आहे की नाही मज्जा? डांबराचे रस्ते टिकत नाहीत म्हणून सिमेंट रस्त्याचे बांधकाम आणि सिमेंट रस्ता निकृष्ट झाला म्हणून डांबराचे ठिगळ!
फौजदारी केव्हा?
मुद्दा असा उपस्थित होतो की, जे.पी. एन्टरप्रायझेस मोठ्या दिमाखाने धामगणगावातील दर्जेदार रस्त्याची शेखी मिरवते. हमी कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच रस्त्याचे अनेक तुकडे झालेत. लोकांच्या पैशांच्या या दुरुपयोगाची आणि करारभंगाची गंभीर दखल घेऊन संबंधित कंपनीविरुद्ध फौजदारी गुन्हे का नोंदविले गेले नाहीत? बांधकाम खात्यांतर्गत चौकशी का केली गेली नाही? संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्टेड करण्याची प्रक्रिया का आरंभली नाही?
मुख्य अभियंता साळवे कधी करणार चौकशी?
जेपीईने पूर्वी बांधलेल्या धामणगावच्या सिमेंट रस्त्याचे तुकडे पडले. कठोरा सिमेंट रस्त्याला उद्घाटनापूर्वीच तडे गेले. क्युरिंगसाठी हल्लीही चक्क मातीचा वापर सुरू आहे. बडनेरा रस्त्याचे काम निकृष्ट आहे. अमरावती बसस्थानकासमोरील रस्त्याचे क्युरिंगच झाले नाही. जेपीईला कोट्यवधींची देयके तरीही दिली गेली. जेपीईद्वारे उघड लूट सुरू असताना सार्वजनिक बांधकाम खाते 'डोळे मिटून दूध पिणाºया मांजरा'च्या भूमिकेत आहे. मुख्य अभियंता विवेक साळवे हे जेपीईच्या करारबाह््य मुद्यांची चौकशी करणार काय, असा प्रश्न जनसामान्यांचा आहे.
नाव मोठे, दर्शन खोटे
जेपी एन्टरप्रायझेस या कंपनीने मेट्रो शहरांसह वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती, धामणगाव, काटोल, कामठी या शहरांमध्ये दर्जेदार कामे केल्याचे त्यांच्या संकेतस्थळावर नमूद केले आहे. 'लोकमत'च्या हाती आलेल्या माहितीनुसार, उल्लेखित शहरांतील कामांचीही स्थिती प्रश्नांकितच आहे.

Web Title: Dhamangaon's Cement Road torn pieces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.