धारणी तालुक्याला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:11 AM2021-05-28T04:11:21+5:302021-05-28T04:11:21+5:30
तेंदुपत्ता, उन्हाळी पिकांना फटका: धारण : तालुक्यात गुरूवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास १५ ते २० मिनिटे सोसाट्याच्या वाऱ्यासह ...
तेंदुपत्ता, उन्हाळी पिकांना फटका:
धारण : तालुक्यात गुरूवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास १५ ते २० मिनिटे सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उन्हाळी मूग आणि भुईमूग तसेच तेंदु पान यांना जबर फटका बसल्याची माहिती आहे.
धारणी तालुक्यात उन्हाळी मुगाची आणि भुईमुगाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली जाते. साधारणपणे या पिकांची मे महिन्याअखेर किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कापणी व मळणीचे काम संपुष्टात येते. यंदा सुद्धा मूंग आणि भुईमुगाची कापणीला सुरुवात करण्याअगोदरच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना हैराण करून सोडले आहे. १६ आणि १८ मे रोजी असाच प्रकारे मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र गुरूवारच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे उन्हाळी मूग कापल्यानंतर शेतातच पडले असून त्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे .
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमार्फत तेंदूपाने संकलनाचे कार्य सुरू आहे. वाळलेले तेंदू पान संकलन करून पोत्यात भरण्याची तयारी असतांनाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने संबंधितांना मोठ्याप्रमाणावर फटका बसणार असल्याची शक्यता आहे. तेंदूपाने ओली झाल्यास काळे पडतात. आणि त्यामुळे त्यांचे भाव कमी होऊन जातो. त्यामुळे याचा फटका संबंधित तेंदूपाने संकलन करणाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे व त्याच्या परिणामी बोनस सुद्धा कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.