चांदूर रेल्वेत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:16 AM2021-08-12T04:16:39+5:302021-08-12T04:16:39+5:30
फोटो - चांदूर रेल्वे : सार्वजनिक सेवा व उद्योगांचे खासगीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध तसेच शेतकरी, कामगार विरोधी कायद्याच्या ...
फोटो -
चांदूर रेल्वे : सार्वजनिक सेवा व उद्योगांचे खासगीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध तसेच शेतकरी, कामगार विरोधी कायद्याच्या व वाढत्या महागाईच्या विरोधात क्रांती दिनी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती संयुक्त कामगार संघटना, डावे, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष व लोकशाहीवादी पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने चांदूर रेल्वे शहरात तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनामध्ये शेतीचे खासगीकरण व कंपनीकरण करणारे, शेतकऱ्यांना शेतीतून बेदखल करणारे तीन कायदे रद्द करा. एमएसपीचा कायदा करा. वीज कायदा रद्द करा व विजेचे खासगीकरण रद्द करा. सार्वजनिक राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण थांबवा. इंधनावरील करवाढ रद्द करा. महागाईवर नियंत्रण आणा. सर्व कामगारांना व कष्टकऱ्यांना कमीत कमी २१ हजार रुपये मासिक उत्पन्न मिळण्याची व्यवस्था करा. ६० वर्षांवरील सर्व कष्टकऱ्यांना १० हजार रुपये मासिक निवृत्तिवेतन देण्याची व्यवस्था करा. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व माध्यान्हचे भोजन देणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या व मानधनात वाढ करा. अपंग, विधवा, निराधार, परित्यक्ता, घटस्फोटित व वृद्ध यांच्या पेन्शनमध्ये वाढ करा. मोफत लसीकरणाची अंमलबजावणी करा. सरकारी विमा कंपनी स्थापन करा खासगीकरण थांबवून शिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
मागण्यांचे निवेदन तहसीलदार राजेंद्र इंगळे यांच्यामार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. या आंदोलनामध्ये विजयकुमार रोडगे, देविदास राऊत, शेखर बद्रे, रामदास कारमोरे, विनोद जोशी, नितीन गवळी, धनश्री श्रीराव, अरुणा आठवले, शारदा राऊत, सुनंदा कांडलकर, सीमा बोडखे, मंदा घाटोळ, सुनंदा नेवारे, गौतम जवंजाळ, कृष्णकुमार पाटील, सतीश चौधरी, मुरलीधर तेलंग, भीमराव बेराड, हरिश्चंद्र गोखे, अशोक मने आदींची उपस्थिती होती.
(बॉक्समध्ये घेणे)
आशा व गटप्रवर्तक महिलांचेही निवेदन
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तक महिलांचे सर्व थकीत मानधन त्वरित देण्यात यावे तसेच विविध मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना (आयटक) च्या चांदूर रेल्वे शाखेच्यावतीने तहसीलदार यांच्यामार्फत ९ ऑगस्टला मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, आरोग्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देतेवेळी आशा स्वयंसेविका प्रज्ञा मोहोड, ए.आर. उईके, ज्योती मरसकोल्हे, सरला भोंगे, वर्षा वानखडे, पूनम शंभरकर, सुवर्णा भालकर, आशा खडसे, सुनीता जुमडे, चंद्रलेखा कांबळे, कोकिळा घटारे, सुवर्णा राठोड, संगीता जवंजाळ, स्वाती बायस्कार, उज्ज्वला चौधरी, वंदना तिवाडे यांसह अनेक महिलांची उपस्थिती होती.
---------------------------