डीएचओंनी केली भामकर हॉस्पिटलची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:11 AM2021-05-29T04:11:31+5:302021-05-29T04:11:31+5:30
परतवाडा : चार दिवसांपासून चर्चेत आलेल्या शहरातील भामकर हॉस्पिटलमध्ये अखेर जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) व त्यांच्या चमुने ...
परतवाडा : चार दिवसांपासून चर्चेत आलेल्या शहरातील भामकर हॉस्पिटलमध्ये अखेर जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) व त्यांच्या चमुने गुरुवारी सायंकाळी एक तास तपासणी केली. रुग्णांच्या तक्रारी पाहता कोरोना नियमानुसार काही त्रुटी आढळून आल्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला जाणार आहे.
परतवाडा शहराला लागून असलेल्या देवमाळी ग्रामपंचायत परिसरात भामकर हॉस्पिटलमध्ये शासनाचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल ३ मार्चपासून उघडण्यात आले. या सेंटरमध्ये डॉ. अरविंद भामकर, डॉ. आशिष भंसाली, डॉ. हेमंत चिमोटे व डॉ. मंगेश भगत असे परतवाडा शहरातील चार डॉक्टर रुग्णांवर उपचार करतात. परंतु रुग्णांकडून अधिक रक्कम घेण्यासह कच्चे बिल दिल्या जात असल्याची तक्रार करण्यात आली होती.
पांढरी येथील रामदास आवारे (६०) हे कोरोना संक्रमित निघाल्याने त्यांना भामकर या डेडिकेटेड कोविड रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार न झाल्याचा आरोप करण्यात आला. रुग्णाची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना पुढील उपचारार्थ अमरावती येथे पीडीएमसी मध्ये दाखल करण्यात आले होते. सुट्टी देताना ५७ हजार रुपये रुग्णांकडून घेतले. मात्र, त्याचे बिल कच्चे दिले. यासंदर्भात रुग्णांच्या नातेवाईक रूपा आवारे यांनी तक्रार केली होती. ‘लोकमत’ने सुद्धा यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. त्याअनुषंगाने डीएचओ दिलीप रणमले यांनी गुरुवारी सायंकाळी ७ वाजतापासून देवमाळी स्थित भामकर हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर योग्य उपचार केला जात आहे किंवा नाही. उपस्थित सुविधा व रुग्णांची विचारपूस व प्रत्यक्ष तपासणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य विभागाची चमू होती.
बॉक्स
अहवालाकडे लक्ष
भामकर हॉस्पिटलमध्ये तपासणी दरम्यान आढळून आलेल्या त्रुटींबाबत गोपनीयता ठेवण्यात आली आहे. यासंदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना सादर केला जाणार आहे. सुविधांचा अभाव असताना इतरही काही रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा दराने आकारणी केल्याची माहिती आहे.
कोट
गुरुवारी सायंकाळी देवमाळी येथील भामकर डेडिकेटेड कोविड रुग्णालयात तपासणी करण्यात आली. या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल.
- दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी