धूलिवंदनाला महिलांच्या अब्रूशी खेळ धावत्या वाहनातून दोघींनी घेतल्या उड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 10:52 PM2019-03-22T22:52:38+5:302019-03-22T22:53:50+5:30
धूलिवंदनाला शहरात टवाळखोरांचा हैदोस पाहायला मिळाला. बडनेरा ते लोणी मार्गावरून लिफ्ट घेणाऱ्या दोन महिलांनी भरधाव वाहनातून उडी घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. याशिवाय विनयभंगाचे तीन, तर मारहाणीचा एक असे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : धूलिवंदनाला शहरात टवाळखोरांचा हैदोस पाहायला मिळाला. बडनेरा ते लोणी मार्गावरून लिफ्ट घेणाऱ्या दोन महिलांनी भरधाव वाहनातून उडी घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. याशिवाय विनयभंगाचे तीन, तर मारहाणीचा एक असे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत.
होळी सणानंतर दुसऱ्याच दिवशी धुळवडीला शहरवासीयांचा उत्साह पाहायला मिळाला. दरवर्षीच यावेळी मारामारी, अपघाताच्या घटनांची नोंद होते. यंदा मात्र महिलांची बेअब्रू करण्याकडे धटिंगणांचा रोख असल्याचे दिसून आले.
फ्रेजरपुरा हद्दीत एक मुलगी घरासमोर रंग खेळत असताना एका विकृताने तिला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. दुसºया घटनेत मोतीनगरात चौकात काही तरुण रंग खेळताना टवाळखोरपणा करीत होते. दरम्यान एका व्यक्तीने त्यांना हटकले असता, वाद निर्माण होऊन मारहाण झाली. यामध्ये तरुण जखमी झाला.
तिसऱ्या घटनेत रंग खेळणाऱ्या काही तरुणांनी पाणी पिण्याचा बहाणा करून एका महिलेचा हात पकडला.
चौथ्या घटनेत रंग लावल्याचा जाब विचारणाºया महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना तपोवन स्थित पंचशील चौकात घडली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रकाश धोटे व एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला.
पाचवी घटना ही राजापेठ हद्दीत घडली. एक १७ वर्षीय मुलगी आईला सोडण्यासाठी मोपेड वाहनावरून जात असताना एका तरुणाने तिची छेड काढली. पाचही घटनांमधून यंदाचे धूलिवंदनात टवाळखोरांनी कळस गाठल्याचे दिसून येत आहे.
थांबण्याची विनंती करुनही दामटले वाहन
बडनेरा येथील रहिवासी २५ वर्षीय महिला गुरुवारी दुपारच्या सुमारास कुंकू कारखान्यातील कामे आटोपून तिच्या मैत्रिणीसोबत पायी लोणीकडून बडनेराकडे येत होती. यादरम्यान एक चारचाकी वाहनात त्या बसल्या. वाहन भरधाव निघाल्यावर केबिनमध्ये चालकासह बसलेल्या तिघांच्या हालचाली व बोलचाल संशयास्पद असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी चालकाला वाहन थांबविण्याची विनंती केली. मात्र, त्याने वाहन दामटले. त्यामुळे धास्तावलेल्या महिलांनी भरधाव मालवाहू वाहनातून मागच्या बाजूने उडी घेतली. सामाजिक कार्यकर्ते राजेश गुल्हानेसह काही जणांनी त्यांना इर्विनला दाखल केले. या घटनेची तक्रार करण्यासाठी शुक्रवारी लोणी पोलीस ठाण्यात जखमीचे नातेवाईक गेले. पोलिसांनी इर्विनमध्ये जाऊन महिलांचे बयाण नोंदविले. पुढील कारवाई सुरू होती.
आईसमोर मुलीची छेडखानी
राजापेठ हद्दीतील एक तरुणी मोपेडवर आईला घेऊन मामाकडे जात होती. दस्तुरनगर रोडवर एका तरुणाने त्यांचे वाहन थांबविले. त्यानंतर त्या तरुणाने मुलीच्या अंगाला स्पर्श करून तेथून पळ काढला. या घटनेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी मनोज परमानंद दारा (रा. दस्तुनगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
मुलीसमोर इसमाचे अश्लील वर्तन
फ्रेजरपुरा हद्दीत एक मुलगी कुटुंबीयांसोबत घरासमोर रंग खेळत होती. यादरम्यान एका इसमाने त्या मुलीसमोर अश्लील वर्तन केले. ती पळून घरात गेली. या घटनेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी नागेश दादाराव धुळे (३०, रा. वडाळी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
नांदगावपेठेत महिलेचा विनयभंग
नांदगावपेठ हद्दीतील एक महिला दिरासोबत रंग खेळत होती. यादरम्यान काही तरुण दिराला रंग लावण्यासाठी आले. दिराला रंग लावून ते निघून गेले. काही वेळानंतर एक तरुण परत आला. त्याने पाणी पिण्यास मागितले आणि महिलेचा हात पकडून तिला ओढाताण केली. महिलेने आरडाओरड केल्याने तो तरुण पळून गेला. नांदगाव पेठ पोलिसांनी या घटनेच्या तक्रारीवरून आरोपी चंद्रशेखर ऊर्फ गोलू मारोती चिनक (२७, रा. रहाटगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
टवाळखोर तरुणांचा धुमाकूळ
मोतीनगर चौकात काही टवाळखोरांनी रंगपंचमीला धुमाकूळ घातला. प्रशांत प्रभाकर पोतदार (३२) याने त्या तरुणांना हटकले असता, त्या तरुणांनी प्रशांतला थापडा-बुक्क्यांनी मारहाण केली. एका तरुणाने चाकू काढून प्रशांतवर वार केला. यासोबत शिवीगाळ करून त्यांनी प्रशांतला जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.