दिवाळीपश्चात २५६ ग्रामपंचायती, १२ बाजार समित्यांमध्ये धूमशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2022 01:50 PM2022-10-25T13:50:11+5:302022-10-25T13:50:39+5:30

ग्रामीण भागातील राजकारणात लगबग, प्रशासनाची तयारी

Dhumshan in 256 gram panchayats, 12 market committees after Diwali | दिवाळीपश्चात २५६ ग्रामपंचायती, १२ बाजार समित्यांमध्ये धूमशान

दिवाळीपश्चात २५६ ग्रामपंचायती, १२ बाजार समित्यांमध्ये धूमशान

Next

अमरावती : जिल्ह्यातील २५६ ग्रामपंचायतींमध्ये कोणत्याही क्षणी सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होऊ शकते. याशिवाय १२ बाजार समितींच्या निवडणुकीसाठी मतदार यादीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकारणात लगबग वाढली आहे. या सर्व ठिकाणी डिसेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे.

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादीचा कार्यक्रम आयोगाने ४ ऑक्टोबरला जाहीर केला होता. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये आता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने या आठवड्यात सार्वत्रिक निवडणूक जाहीर होऊन डिसेंबर महिन्यात मतदान होण्याची शक्यता आहे. याशिवाय आयोगाने दोन दिवसांपूर्वी दोन ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केल्याने त्या ठिकाणीही निवडणूक होण्याची शक्यता आहे. याशिवाय जिल्ह्यातील अमरावती-भातकुली, तिवसा, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी, वरूड, अचलपूर, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर व धारणी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणुकांच्या पूर्व मतदार यादीचा कार्यक्रम सुरू आहे. या सर्व बाजार समित्यांमध्ये निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्जाला सुरुवात होत आहे. या सर्व बाजार समित्यांमध्ये सध्या प्रशासकराज आहे व निवडणूक घेण्याच्या अनुषंगाने राज्य सहकारी प्राधिकरणाद्वारा ६ सप्टेंबरला निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती.

शेतकऱ्यांना मताधिकार केव्हा?

बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व शेतकऱ्यांना मताधिकार देण्याचा निर्णय विद्यमान सरकारने घेतलेला आहे. मात्र, याविषयीचा अध्यादेश अद्याप जारी झालेला नाही. त्यामुळे प्रचलित पद्धतीनेच सोसायटी मतदारसंघ ११, ग्रामपंचायत ४, व्यापारी २ व हमाल, अडते मतदारसंघासाठी १ असे एकूण १८ संचालकपदासाठी ही निवडणूक होणार आहे.

थेट सरपंचपदाने तापले वातावरण

सार्वत्रिक निवडणूक असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी जनतेमधून थेट सरपंच निवडला जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी आहे. अनेक उमेदवारांनी यासाठी तयारी सुरू केलेली आहे. गणेशोत्सव, नवरात्री, दसरा व आता दिवाळीदरम्यान इच्छुकांचा मतदारांशी व्यापक संपर्क अभियान सुरू होते.

Web Title: Dhumshan in 256 gram panchayats, 12 market committees after Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.