‘सुपर’मध्ये ८६१० रुग्णांचे डायलेसिस, तर सहा किडनी शस्त्रक्रिया
By उज्वल भालेकर | Published: April 5, 2023 06:15 PM2023-04-05T18:15:24+5:302023-04-05T18:15:37+5:30
किडनीचा आजार झाल्यास डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेशिवाय इतर कोणताही पर्याय नाही.
अमरावती : किडनीचा आजार झाल्यास डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेशिवाय इतर कोणताही पर्याय नाही. परंतु हे उपचार सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे नाहीत; परंतु विभागीय संदर्भ रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे मागील ११ महिन्यांमध्ये ८,६१० रुग्णांवर डायलेसिस उपचार, तर सहा रुग्णांना किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करून त्यांचे प्राण वाचविण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. बदलत्या जीवनशैलीमुळे जिल्ह्यातही किडनी आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
किडनी हा मानवाच्या सर्वांत महत्त्वाच्या अवयवांपैकी एक अवयव आहे. शरीरातील विष किंवा कचरा काढून टाकणे, शरीरातील रक्त आणि अतिरिक्त द्रव पदार्थ बाहेर फेकणे आणि स्वच्छ करणे, लाल रक्तपेशींसाठी हार्माेन्स तयार करणे, तसेच व्हिटॅमिन-डीचे शोषण वाढविण्याचे काम किडनी करते. बदलती जीवनशैली खाण्या-पिण्याच्या वाईट सवयी यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असून, याचा सर्वाधिक परिणाम हा किडनीवर होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मागील अकरा महिन्यांत ८,६१० रुग्णांवर डायलेसिस उपचार करण्यात आले आहेत.
दरमहा अशी आहे डायलेसिस रुग्णांची आकडेवारी
- एप्रिल ७०९
- मे ७३०
- जून ७७५
- जुलै ७८७
- ऑगस्ट ७५७
- सप्टेंबर ७२५
- ऑक्टोबर ६८३
- नोव्हेंबर ७५३
- डिसेंबर ९१६
- जानेवारी ९१०
- फेब्रुवारी ८६५
- एकूण ८,६१०
डायलेसिस मशीनद्वारे अशुद्ध घटक बाहेर काढून शुद्ध रक्ताचा पुरवठा
किडनी निकामी ठरल्यानंतर रुग्णाला वाचविण्यासाठी डायलेसिस हा पर्याय उत्तम ठरतो. सुपरच्या डायलेसिस युनिटमध्ये एकूण १९ मशीन आहेत. या मशीनद्वारे रुग्णांच्या शरीरातील रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकून शुद्ध रक्त शरीरात पुरविले जाते. ही मशीन किडनीसारखेच कृत्रिमरीत्या काम करते. किडनीग्रस्त रुग्ण हा डायलेसिस उपचार घेऊन १५ वर्षांपासून जास्त काळ जगू शकतो.
ही लक्षणे आढळताच डॉक्टरांचा सल्ला घ्या
किडनी निकामी झाल्याचे काही लक्षणावरून दिसून येते. यामध्ये लघवीचा रंग बदलणे, सतत लघवीला होणे, लघवी करताना जळजळ होणे, घोट आणि पाय सुजणे, मळमळ किंवा उलट्या होणे, भूक न लागणे, चिडचिड होणे, अशक्तपणा आणि थकवा जाणवणे, पाठदुखी होणे, ओटीपोटात दुखणे अशी ही लक्षणे आहेत. त्यामुळे ही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांना दाखविणे गरजेचे आहे.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डायलेसिसचे उपचार हे मोफत होतात. मागील अकरा महिन्यांमध्ये ८,६१० रुग्णांवर डायलिसिस उपचार केले आहेत. तर सहा रुग्णांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियादेखील यशस्वी केल्या आहेत. किडनीच्या आजारापासून दूर राहण्यासाठी खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीपासून दूर राहणे गरजेचे आहे. - डॉ. अमोल नरोटे, वैद्यकीय अधीक्षक, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.