धारवाड येथे अतिसाराचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 12:18 AM2018-05-01T00:18:47+5:302018-05-01T00:19:08+5:30
तिवसा तालुक्यातील धारवाडा (पुनर्वसन) येथे ५० वर्षीय इसमाचा पाण्यातून झालेल्या अतिसाराने २८ एप्रिल रोजी मृत्यू झाला. लागण झालेल्या अन्य १३ रुग्णांवर तापत्या उन्हात वर्गखोल्यांतच उपचार सुरू असल्याने त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुऱ्हा : तिवसा तालुक्यातील धारवाडा (पुनर्वसन) येथे ५० वर्षीय इसमाचा पाण्यातून झालेल्या अतिसाराने २८ एप्रिल रोजी मृत्यू झाला. लागण झालेल्या अन्य १३ रुग्णांवर तापत्या उन्हात वर्गखोल्यांतच उपचार सुरू असल्याने त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे. विशेष म्हणजे, दोन दिवस लोटूनही प्रशासनाकडून पाणी नमुना चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. जिल्ह्याची आरोग्यसेवा किती गंभीर, असा सवाल सोमवारी येथे भेट देणाऱ्या आ. यशोमती ठाकूर यांनी केला.
धारवाडा गावातील पांडुरंग दशरथ तायवाडे (५०) यांना २८ एप्रिलला अतिसाराची लागण झाली होती. त्यांना प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात नेताना त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय १३ जणांना लागण झाली आहे. त्यामध्ये बहुतांश पाहुणे मंडळी आहेत. गावात २८ एप्रिललाच संदीप सोटे यांच्याकडे आयोजित विवाह सोहळ्यात वापरलेल्या घराजवळील विहिरीच्या पाण्यातून हा प्रकार उद्भवला. विहिरीवर १० ते १२ कुुटुंब मोटार लावून पाणी वापरतात. यानंतर कुºहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने गावातीलच वर्गखोलीत उपचार सुरू केला. एका रुग्णाला अमरावती येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
दरम्यान, ३० एप्रिलला आ. यशोमती ठाकूर यांनी गावाला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. रुग्णांसाठी खाटेची व्यवस्था नसून, त्यांना खालीच चादर टाकून झोपवण्यात येत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. पाणी तपासणी रिपोर्ट न येणे ही आरोग्य प्रशासनाच्या कारभाराची मोठी शोकांतिका आहे, असेही त्या म्हणाल्या. वर्गखोलीत उपचार घेत असलेल्या रुग्णांना दिलास मिळण्यासाठी आमदार यशोमती ठाकूर यांनी स्वखर्चाने कुलर उपलब्ध केला.
पंचायत समितीचे बीडीओ व यंत्रणा गंभीरतेने घेत नाहीत. गावात पाणीपुरवठ्याला लिकेज असताना ग्रामपंचायत व पंचायत समितीचे दुर्लक्ष आहे. बेपर्वा आरोग्य यंत्रणेमुळे अतिसाराने बळी गेला. प्रचंड उष्णतामानात वर्गखोलीत रुग्ण असल्याने कूलर उपलब्ध केला.
- यशोमती ठाकूर,
आमदार, तिवसा
धारवाड येथे पाणीपुरवठ्याची जलवाहिनी लिकेज आहे. यामधून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. याविषयी पत्र दिले. आरोग्य पथक कर्तव्यावर आहे. अतिसार नियंत्रणात आहे.
- सुरेश असोले
जिल्हा आरोग्य अधिकारी