मेळघाटच्या जामली गावात अतिसाराचे थैमान, तिघांचा मृत्यू ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 11:15 IST2024-09-13T11:13:49+5:302024-09-13T11:15:10+5:30
२१ दिवसांत ९ जण दगावले, २३ जणांना अतिसाराची लागण: आतापर्यंत दीडशे रुग्णांची तपासणी, आरोग्य यंत्रणा तळ ठोकून

Diarrhea epidemic in Jamli village of Melghat, three died?
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : तालुक्यातील जामली आर येथे तीन दिवसांपासून दूषित पाण्यामुळे दीडशेपेक्षा अधिक आदिवासींना जलजन्य आजाराची लागण झाली. यापैकी २३ रुग्णांवर येथील जिल्हा परिषद शाळेत उपचार होत आहे. गावातील तिघांचा मृत्यू अतिसाराने झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून आरोग्य यंत्रणा अहवालाची प्रतीक्षा करीत आहे. मागील २१ दिवसांत विविध आजारांनी पाच वयोवृद्धांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याने आदिवासींमध्ये दहशत पसरणारे ठरले आहे.
तालुक्यातील जामली आर येथे सोमवारपासून ओकारी, हगवणीची साथ सुरू झाली. आतापर्यंत १५० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. २३ रुग्णांवर गावातीलच जिल्हा परिषद शाळेत उपचार होत आहेत. मागील २१ दिवसांत वयोवृद्धांसह एकूण दहा जणांचा मृत्यू झाला. बुधवारी आमदार राजकुमार पटेल यांनी भेट देऊन योग्य निर्देश दिले व आदिवासींसोबत संवाद साधला. आरोग्य यंत्रणा तळ ठोकून आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे ?
टेंबूसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत जामली आर येथे आरोग्य उपकेंद्र आहे. दोन हजार लोकसंख्येच्या या गावाला एक वर्षापासून कायमस्वरूपी आरोग्य सेविका नाही. कंत्राटी आरोग्य सेविकेच्या भरवशावर कारभार आहे. उपकेंद्रात विद्युत पुरवठा नसल्याने रात्री रुग्णांना घरी परतावे लागत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.
टँकरने पुरवठा, पाइप लीकेज?
- गावातील विहिरीचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद करण्यात आला.
- तथापि, ते पाणी दूषित नसल्याची माहिती पुढे आली आहे. पाइप लाइन लीक झाल्याने दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा संशय वर्तविण्यात आला आहे.
- तूर्तास गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
आदिवासींमध्ये असेल. मृत्यूने दहशत
तीन दिवसांपासून जामली गावात नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले. पैकी नीलेश गणेश परते (२९), संगीता शालिकराम भुसूम (३०), दीपाली योगेश जांबू (२५) यांचा मृत्यू अचानक ओकारी व पोटदुखीने झाला. त्यांचा अतिसारामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. याशिवाय बाबूलाल कासदेकर (७५), रिचू जयाराम काळे (७२), सोनाय कासदेकर (९०), मनाजी कासदेकर (८०), बाबनू दहीकर (१०) यांचा वृद्धापकाळ व इतर आजारांनी मृत्यू झाला. तर बुडी महादू कासदेकर (९५) ही वृध्दा गुरुवारी दगावली.
"२१ दिवसांत दगावलेल्या आठपैकी तीन रुग्णांचा ओकारी व पोटदुखीने मृत्यू झाला. तथापि, अहवाल अप्राप्त आहे. दीडशे रुग्णांची तपासणी करण्यात आली. २३ रुग्ण शाळेत उपचार घेत आहेत."
-डॉ. चंदन पिंपळकर, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा