अतिसार आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:27 AM2018-05-11T01:27:20+5:302018-05-11T01:27:20+5:30
तालुक्यातील सोनापूर येथे अतिसाराची लागण नदी-नाल्यात खोदून तयार केलेल्या झºयाच्या दूषित पाण्यामुळे झाल्याचे प्रयोगशाळेत तपासणीनंतर स्पष्ट झाले आहे. आरोग्य यंत्रणा तळ ठोकून असल्याने चौथ्या दिवशी येथील अतिसाराची लागण आटोक्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : तालुक्यातील सोनापूर येथे अतिसाराची लागण नदी-नाल्यात खोदून तयार केलेल्या झºयाच्या दूषित पाण्यामुळे झाल्याचे प्रयोगशाळेत तपासणीनंतर स्पष्ट झाले आहे. आरोग्य यंत्रणा तळ ठोकून असल्याने चौथ्या दिवशी येथील अतिसाराची लागण आटोक्यात आली आहे.
सोनापूर येथे भीषण पाणीटंचाई उद्भवल्याने आदिवासींना नदी-नाल्यांमध्ये झरे खोदून पाणी प्यावे लागले. परिणामी गावात मोठ्या प्रमाणात अतिसाराची लागण झाली. गुरुवारी चौथ्या दिवशी परिस्थिती आटोक्यात आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले असले तरी तीन रुग्ण आढळून आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे, तर आतापर्यंत लागण झालेल्या रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचे चित्र आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक आसोले, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. चºहाटे, डॉ. अभ्यंकर यांच्यासह टेम्ब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची चमू, परिचारिका, एमपीडब्ल्यू सोनापूर गावात तळ ठोकून आहेत.
प्रकल्प अधिकारी फिरकलेच नाही
सोनापूर येथे पाणी उपलब्ध न केल्याने आदिवासींना नदी-नाले, विहिरींच्या तळाचे पाणी प्यावे लागले. या पाण्यातूनच गावात अतिसाराची लागण झाल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अंबर मडावी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गावात तीन डॉक्टरांसह परिचारिका, आरोग्य कर्मचारी घराघरांत जाऊन पाण्याची तपासणी करीत आहेत. कुपोषण निर्मूलनाची जबाबदारी असलेले एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी चार दिवसानंतरही गावात फिरकले नसल्याचा आरोप आदिवासींनी केला आहे.
सोनापूर येथील परिस्थिती चौथ्या दिवशी नियंत्रणात आली आहे. पाणी नमुने तपासणी केली असता, दूषित आढळून आले आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस तैनात ठेवण्यात आली आहे.
- अशोक आसोले,
जिल्हा आरोग्य अधिकारी