धामकचे प्रकल्पग्रस्त भूखंडापासून वंचित
By admin | Published: April 23, 2016 12:12 AM2016-04-23T00:12:59+5:302016-04-23T00:12:59+5:30
तब्बल १४ वर्षाच्या प्रतिक्षेनंतरही धामक येथील प्रकल्पग्रस्तांना भुखंडाचे वाटप न झाल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी उपोषणाचा मार्ग अवलंबिणार असून ....
प्रतीक्षा व्यर्थ : अन्यायग्रस्तांनी धरली उपोषणाची कास
मनोज मानतकर नांदगाव खंडेश्वर
तब्बल १४ वर्षाच्या प्रतिक्षेनंतरही धामक येथील प्रकल्पग्रस्तांना भुखंडाचे वाटप न झाल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी उपोषणाचा मार्ग अवलंबिणार असून त्यासाठी प्रशासनाला आठ दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.
सन २००२ मध्ये धामक मधील अर्ध्यागावाचा पुनर्वसनात समावेश करण्यात आला व त्यासाठी ५३ एकर जमीन संपादीत करण्यात आली व त्यामध्ये ४३ प्रकल्पग्रस्तांना भुखंडाचे वाटप करून ताबा पावती सुद्धा देण्यात आली परंतु इतर प्रकल्पग्रस्तांना मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे भुखंड मिळण्यासाठी ताटकळत रहावे लागत आहे. धामक गावात ५५१ कुटूंब वास्तव्यास असून त्यापैकी २१५ कुटुंबाचा पुनर्वसनात समावेश झाला आहे व उर्वरीत गावाचा पुनर्वसनात समावे करून धामक ‘मॉडेल गाव’ बनवण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी केला. परंतू अद्यापपर्यंत संपूर्ण धामक गावाचे एकाच ठिकाणी पुनर्वसन करण्यासंदर्भात शासन व प्रशासनाला अपयश आले आहे व त्याला कारणही तसेच आहे. बहुतांश प्रकल्पग्रस्तांची शेतजमीन नवीन पुनर्वसन परिसरात आहे त्यामुळे नवीन गावाठाणमध्ये भुखंडाचे वाटप व्हावे अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे तर काही प्रकल्पग्रस्तांनी बेलोरा गावठाण नजीक भुखंडाची मागणी केली आहे तर काही ठराविक प्रकल्पग्रस्तांनी येवती गावठाणला पसंती दर्शविली आहे. परंतु ज्या ठिकाणी बहुतांश प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची शेतजमीन आहे. त्याच ठिकाणी भुखंडाचे वाटप व्हावे ही रास्त मागणी आहे व त्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी ३-११-२०१५ व १५-२-२०१६ तसेच २२-२-२०१६ ला वारंवार अधिकाऱ्यांना निवेदन दिले व त्यानंतर प्रशासनाने धामक येथील तलाठी, ग्रामसेवक यांना सूचना देवून (बचत भवन, अमरावती) येथे प्रकल्पग्रस्तांना भुखंडाचे वाटप करण्याचे ठरले. परंतू काही कळण्याअगोदरच या भूखंड वाटपाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे संयमाचा बांध तुटल्याने अखेर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी शासनाने कोट्यवधी खर्चून पुनर्वसन स्थापित केले. त्याच ठिकाणी भुखंड मिळण्यासाठी अर्ज केला आहे जर तात्काळ भुखंडाचे वाटप न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.